इंदापूर : कधीही नफा, तोटा याचा विचार न करता तब्बल चार पिढ्यांपासून इंदापूरच्या शहा परिवाराने खिलार गाईंच्या गोठ्याचे संगोपन मनापासून केले आहे. त्यामुळे देशी गाईच्या दुधाचे चव इंदापूरकरांंना चाखता येते. शेणखत व गोमूत्र यापासून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची किमया या खिल्लार संगोपनातून केली असल्याचे गौरवोद्गार बारामती ॲग्रोचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी काढले.
राजेंद्र पवार यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांच्या देशी खिल्लार गाईच्या गोठ्याची तसेच जिरेनियम शेतीची पाहणी केली. यावेळी अंगद शहा, प्रशांतशेठ वरुडजकर, धवलशेठ शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राजेंद्र पवार म्हणाले की, राज्यातील अनेक गाई संगोपन करणारे शेतकरी पाहिले आहेत. मात्र केवळ संस्कृती, संस्कार व सकस आहार या तीनही गोष्टीचा मिलाप शहा परिवाराने साधला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीसाठी वेगळा आदर्श यातून घेता येणार आहे. यावेळी खिल्लार गाई गोठ्यात संदर्भात माहिती देताना मुकुंद शहा म्हणाले की, नारायणदास रामदास चारीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देशी खिलार गाईचे संगोपन शहा परिवाराची चौथी पिढी करीत आहे. या गाईंची कधीही विक्री केली जात नाही. त्यामुळे तब्बल दीडशे खिल्लार गायी व लहान खोंड संगोपन सुरू आहे. यांत्रिकीकरण आणि वाढता पालनपोषणाचा खर्च या सातत्याने भेडसावणाऱ्या कारणामुळे देशी खिलार गाई बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून खिलार गाईचा गोठा यातील गाई यांचा सांभाळ योग्य पद्धतीने होतो.
संकरित गायीच्या तुलनेमध्ये देशी गायीचे दूध लहान बालकांसाठी व वृद्धांपर्यंत अतिशय पोषक शरीराला असल्यामुळे या खिल्लार गोठ्या मधून निघणारे संपूर्ण दूध इंदापूरकरांंना रोज ताजे उपलब्ध होत आहे. तर गोमूत्र, शेणखत शेतीला वापरल्यामुळे अधिकचे सेंद्रिय उत्पन्न मिळण्यास मोठी मदत होते.
इंदापूर येथील खिलार गाईंच्या गोठ्याची याची पाहणी करताना राजेंद्र पवार तसेच मुकुंद शहा, अंगद शहा व मान्यवर.