- अशोक खरात, खोडद
(ऐतिहासिक वारसांची दुरवस्था)
जुन्नरचा ऐतिहासिक वारसा आणि जुन्नरमधील प्राचीन इतिहास यांची साक्ष कोलमडलेल्या अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. या प्राचीन वास्तू आपल्या अस्तित्वातून आजही देत आहेत. खिरेश्वर येथील नागेश्वराच्या प्राचीन मंदिराची सध्याची अवस्था पाहता, जुन्न तालुक्यातील हा प्राचीन इतिहास आणि ऐतिहासिक वारसा असलेला अनमोल ठेवा अखेरचा श्वास घेत असल्याचे पाहावयास मिळते.जुन्नर तालुक्यातील पिंपळगावजोगा धरणाच्या परिसरात खिरेश्वर गावाजवळ नागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती असून, त्याचा इतिहास जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीचा आहे. अशा मंदिरांची निर्मिती नाशिकपासून भीमाशंकर यामधील जंगल व दुर्गम भागात पाहावयास मिळते. याच स्वरूपातील जुन्नर तालुक्यात खिरेश्वर, कुकडेश्वर व पारुंडे येथे मंदिरे आहेत.मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर गाभाऱ्याच्या छताला मध्यभागी एक छिद्र पडलेले असून त्यात एक लोखंडी रॉड अडकवला आहे. या रॉडला एक कमंडलू अडकवण्यात आला आहे, ज्यातून सतत पिंडीवर पाणी पडते. या रॉड अडकवलेल्या ठिकाणाहून वर कळसाकडे पाहिले, तर छतावरील संपूर्ण भाग मोकळा म्हणजे पोकळ असल्याचे दिसते. या मूर्ती मंदिर परिसरात कुठेही दिसून येत नाहीत. मंदिराच्या पाठीमागे वर मध्यभागी असलेल्या तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील झोपलेल्या विष्णूच्या मूर्तीचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. तिचा एक हात व एक पाय निकामी झाल्याचे स्पष्ट दिसते. मंदिरालगत बाहेर उत्तरेस चार कातळ कोरीव शिवलिंगे दिसतात व तेथून मंदिराच्या कळसाचे निरीक्षण केले, तर मंदिर उत्तरेस झुकल्याचे संकेत मिळतात. मंदिर परिसरात अनेक भग्न अवशेष पाहावयास मिळत आहेत.- जुन्नर तालुक्यात असणाऱ्या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचा थोड्याफार प्रमाणात फायदा स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी होऊ लागला आहे. एकीकडे जुन्नरचे प्राचीन वैभव पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत, तर दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील प्राचीन वास्तू जीर्णावस्थेत जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हा विरोधाभास दिसत आहे. जुन्नर तालुक्यातील प्राचीन वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.- जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील हेच ते नागेश्वराचे प्राचीन मंदिर. या मंदिराची सध्या दुरवस्था झाली असून, ते अखेरच्या घटका मोजत आहे.