पुणे :'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या गाजलेल्या मराठी चित्रपटात घडलेला प्रसंग प्रत्यक्ष पुण्यात घडला आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी एका उमेदवाराने अनामत रक्कम म्हणून चक्क २५ हजार रुपयांची चिल्लर भरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यातल्या या 'प्रति नारायण वाघ'ची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मकरंद अनासपुरे यांनी 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या चित्रपटात साकारलेल्या इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिल्लर भरल्याचा प्रसंग साकारले आहे. त्यात रक्कम मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः घाम फुटलेला दिसत होता. असाच प्रसंग प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयात बघायला मिळाला. भरत बस्तीमल जैन असे या उमेवाराचे नाव असून त्यांनी १, २, ५ आणि १० रुपयांची तीन पिशवीभर नाणी आणून अनामत रक्कम भरली. ते शहरातील महर्षीनगर भागात राहतात. त्यांच्या या पावित्र्यामुळे अधिकारीही वैतागले होते मात्र त्यांनी पैसे मोजून रक्कम भरून घेतली.
याबाबत जैन लोकमतला म्हणाले की, अधिकारी अनेकदा त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या जनतेला चिल्लरसारखी वागणूक देतात. म्हणून मी त्यांना चिल्लर दिली. दरम्यान पुण्यात शेवटच्या दिवशी (दि.४) रोजी ४६ जणांनी ५९ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जाची उद्या छाननी केली जाणार असून ८ तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची तारीख आहे.