पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) तर्फे बीबीए, बीसीए , बीएमएस आणि बीबीएम या पदवी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेण्यासाठी अतिरिक्त सीईटीचे आयाेजन केले आहे. उमेदवारांना सीईटी परीक्षेला बसण्यासाठी सीईटी सेल पाेर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दि. ८ जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी च्या माध्यमातून यंदापासून बीबीए, बीसीए, बीएमएस आणि बीबीएम या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. सीईटी सेल तर्फे यापूर्वी दि. २९ मे रोजी महा- बी.बी.ए, बी.सी.ए, बी.बी.एम आणि बी.एम.एस. सीईटी- २०२४ घेण्यात आली. मात्र, असंख्य बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच पालकांना या प्रवेश परीक्षेबाबत माहिती नव्हती. त्यामुळे या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पुन्हा एकदा सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे सीईटी सेलतर्फे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले हाेते. तसेच अतिरिक्त सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेत प्रवेश अर्जासाठी दि. २९ जून ते ३ जुलै पर्यंत मुदत दिली हाेती.
अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवस मुदत वाढवावी अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता सीईटीच्या नाेंदणीस मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांना आता येत्या साेमवार दि. ८ जुलै पर्यंत अर्ज करता येतील त्यानंतर काेणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सीईटी सेलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.