पुणे : म्हाडाच्या पुणे विभागाने काढलेल्या सुमारे सहा हजार सदनिकांच्या सोडतीला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ही मुदत आता २० ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे. या सोडतीचा लकी ड्रॉ ९ नोव्हेंबर रोजी काढला जाणार आहे.
म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांच्या सोडतीसाठी ६ सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारपर्यंत (दि. २७) अर्ज करण्याची मुदत होती. तर अनामत रक्कम भरण्यासाठी २८ सप्टेंबरची मुदत होती. ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी २९ सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती.
मात्र, अर्जदारांना अर्जासोबतच रहिवासाचा दाखला बंधनकारक करण्यात आल्याने परिपूर्ण अर्जच स्वीकारले जात होते. या महिन्यात असलेल्या सुट्यांमुळे अनेक अर्जदारांना रहिवासाचा दाखला संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून वेळेत उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे अर्जदारांसह अनेक संस्था संघटनांकडून ही मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी म्हाडाकडे केली होती. त्यानुसार ही मुदत आता २० ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे. अर्जदारांना अनामत रक्कम भरण्यासाठी २१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृती अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी २७ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. तर अंतिम यादी ३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर ९ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केले जातील. या सोडतीसाठी बुधवार (दि. २७) सायंकाळपर्यंत ३२ हजार ९९६ जणांनी अर्ज केले होते. तर १८ हजार ३६९ जणांनी अनामत रक्कम भरली होती.
या सोडतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, कागदपत्रे मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच आता ही मुदत २० ऑक्टोबर अशी करण्यात आली आहे. अर्जदारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
- अशोक पाटील, मुख्याधिकारी, म्हाडा पुणे