तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपरी-साकेरी यादरम्यान असणारा जुना पूल अखेरच्या घटका मोजत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यामध्ये असणारा पिंपरी व साकेरी ही दोन गावे जोडणारा गुहीरा या नदीवरील पूल जुना झाल्याने हा पूल मृत्युचा सापळा बनला आहे. अत्यंत धोकादायक असणाऱ्या या पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याचप्रमाणे जुना झालेल्या या पुलाची दगडी कोसळत आहेत. पिंपरी व साकेरी ग्रामस्थांनी या पुलाबाबत प्रशासनाला कळवले असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे साकेरी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कढण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पिंपरीवरुन साकेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुहीरा नदीवर असलेल्या या पुलाच्या पुढे साकेरी गावठाण, गवारवाडी, खडकवाडी, मोहंडुळेवाडी, वनघरटेप, आडारीवस्ती, कारोटेवस्ती, या गावातील ग्रामस्थांची नेहमीच या पुलावरुन वर्दळ असते. साकेरी व या परिसरातील गावातील शाळेतील मुलांना या पुलावरुनच ये-जा करावी लागते. कठडा नसलेल्या व दुरवस्था झालेल्या या पुलावर ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.श्रावण महिन्यामध्ये पिंपरी येथील महिला साळाबाई बांबळे या जनावरे चरावयासाठी पुलावरुन पलीकडे जात असताना पाय घसरुन नदीत पडून मृत्यू पावल्या. या पुलाला कठडे असते तर या महिलेचा जीव वाचला असता. आम्ही ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ही मोठी घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही, असे साकेरी ग्रामस्थ अशोक तारडे व मच्छिंद्र कढण यांनी सांगितले. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादू गवारी, साकेरीचे ग्रामस्थ अशोक तारडे, मच्छिंद्र कढण, होनाजी आढारी, सखाराम आढारी यांनी केली आहे. (वार्ताहर) साकेरी हे गाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अत्यंत डोेंगरदऱ्या-खोऱ्यामध्ये वसलेले गाव असून, या गावामध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. साठ ते सत्तर घरे असणाऱ्या गावामध्ये दळणवळणासाठी गेली कित्येक वर्षांपूर्वी गुहीरा नदीवर पूल बांधण्यात आला. यामुळे या गावांचा संपर्क पाटण खोऱ्याशी येऊ लागला. या गावामध्ये आजारी पडलेल्या ग्रामस्थाला डोली करून दहा किमी असणाऱ्या तळेघर येथे आणावे लागत असे, परंतु हा पूल झाल्यानंतर या गावातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला होता.
पूल मोजतोय अखेरच्या घटका
By admin | Published: February 18, 2017 2:43 AM