सांगवी - शिधापत्रिकेत आॅनलाइन पद्धतीने आधार कार्ड जोडणीचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण हे कामकाज ९० टक्क्यांवर गेले असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक महादेव भोसले यांनी दिली. मध्यंतरी उच्च न्यायालयाने आधार कार्ड आणि आरसी क्रमांक बंधनकारक असल्याचे घोषित केले होते.तालुक्यातील काही कुटुंबाच्या शिधापत्रिकेवर आरसी क्रमांक उपलब्ध नव्हते. आरसी क्रमांक नसल्यास धान्य मिळणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर ज्या कुटुंबाच्या शिधापत्रिकावर आरसी क्रमांक नसतील, त्यांना बारामती तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदाराकडून शिधापत्रिकेवर खासगी कंत्राटदाराकडून आरसी क्रमांक आणण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर धान्य लाभार्थी महिनाभरापासून आरसी क्रमांक मिळवण्यासाठी आणि आधार कार्ड जोडणीसाठी बारामतीतील खासगी कंत्राटदाराकडे धावपळ सुरू होती.तहसील कार्यालयाचे आॅनलाईन आधार कार्ड जोडणीचे कामकाज खासगी कंत्राटदाराकडे आहे. तिथे कामकाज करताना एखाद्या कुटुंबाच्या शिधापत्रिकेत सर्व माहिती आॅनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा तो उघडत नाही. यामुळे काही कुटुंबाच्या नवीन सदस्यांची नावे समाविष्ट किंवा पुन्हा चुका दुरुस्त करायची असल्यास अडचणी येत आहेत.गेली तीन ते चार वर्षांपासून शिधापत्रिकात कुटुंबातील आधार क्रमांक जोडणीचे कामकाज सुरू आहे. त्यानंतर तालुक्यातील जवळपास सर्व आधारलिंकचे कामकाज पूर्णत्वास आले होते. परंतु, काही वयोवृद्ध लोकांच्या अंगठ्याचा ठसा आधार मशीन जुळवून घेत नसल्याने त्यांचे आधार कार्ड काढायचे राहून गेले, यामुळे १० टक्के राहिलेल्या कामात अशा लोकांचा समावेश आहे. यामुळे त्यांच्या नावाच्या पावतीद्वारे धान्य वाटप करण्यात येत होते.सॉफ्टवेअर उपलब्ध होणार नाहीपुढल्या महिन्यापासून नवीन सिस्टीम चालू होणार आहे. सध्या प्रत्येक रेशनिंग दुकानदारांकडे असणाऱ्या बायोमेट्रिक मशीनला नवीन सॉफ्टवेअर उपलब्ध होणार आहे. यापुढे कोणत्याही कुटुंबातील शिधापत्रिकात नवीन सदस्यांची नावे समाविष्ट किंवा कमी करायची असल्यास तसेच इतर चुका दुरुस्त करायची असल्यास या सॉफ्टवेअरद्वारे रेशनिंग दुकानदाराकडे करू शकणार आहे. त्याचबरोबर या सॉफ्टवेअरमुळे वयोवृद्ध लोकांच्या हाताचे कोणतेही बोटाचा ठसा जुळवून घेऊ शकणार आहे.यामुळे त्यांच्या जुळत नसलेल्या अंगठ्याच्या ठशाचा प्रश्न मिटाणार आहे. तसेच, धान्य लाभार्थी या नवीन सॉफ्टवेअरमुळे महाराष्ट्रात कुठेही धान्य खरेदी करू शकणार आहे. प्रशासकीय भवनात जिल्हा पुरवठा कार्यालय यांच्या वतीने सर्व रेशनिंग दुकानदारांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढल्या महिन्यापासून हे कामकाज सुरळीत चालू होईल, असे पुरवठा निरीक्षक महादेव भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आधारजोडणीचे कामकाज अंतिम टप्प्यात, शिधापत्रिकेत नावनोंदणीसाठी होणारी धावपळ थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:36 AM