लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक दिवस घरात कोंडून घेऊन उपाशी राहिल्याने प्रकृती नाजूक बनलेल्या राजेंद्रनगरमधील ५५ वर्षांच्या त्या व्यक्तीला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने गणेश कला मंच येथील जम्बो सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले होते. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना शोधले. मात्र, रात्री अंत्यसंस्कारासाठी येणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितल्याने कोरोनाबाधित नसतानाही, पुणे शहरात दोन बहिणी असताना महापालिकेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या बहिणीकडे त्यांच्या अस्थी देण्यात आल्या.
सुनील दुसाणे असे त्यांचे नाव होते. याबाबत त्यांच्या बहिणीने सांगितले की, सुनील दुसाणे हे आयआयटी झाले होते. ते दुचाकी दुरुस्तीचे काम करीत होते. त्यांचा संसार फुलला नाही. त्यानंतर ते आईवडिलांसमवेत रहात होते. २००७ मध्ये आईचे तर, २०१७ मध्ये वडिलांचे निधन झाल्याने ते सध्या एकटेच रहात होते. मुळात ते शांत स्वभावाचे असल्याने कोणाशी त्यांचा फारसा संपर्क नसायचा. कोरोनामुळे प्रत्यक्ष भेटी होत नव्हत्या. गेल्या महिन्यात त्यांची तब्येत चांगली नव्हती. १ मे रोजी त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. तेव्हा त्यांनी आता तब्येत बरी आहे, असे सांगितले होते. आपलीही तब्येत बरी नसल्याने त्यानंतर त्यांंच्याशी बोलणे झाले नव्हते, असे त्यांच्या बहिणीने सांगितले.
डॉ. मिलिंद भोई यांनी त्यांच्यावर उपचार व्हावेत, यासाठी धावपळ करुन त्यांना जम्बो सेंटरमध्ये दाखल केले होते. मात्र, अनेक दिवस काहीही न खाल्याने त्यांची रक्तातील साखर ४५० पर्यंत वाढली होती. त्यात रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचा-यांनी मध्यरात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
राहुल मानकर व इतरांनी धडपड करून त्यांच्या नातेवाईकांना शोधून काढले. त्यांची बहिण व भाच्याकडे त्यांच्या घराची चावी व अस्थी सुपूर्द केल्या़.