पुणे : मतदार यादीत नाव नसणे, प्रभागाच्या बदलामुळे मतदारांची झालेली धावपळ, मतदारांचा मतदान यंत्राबद्दल उडत असलेला गोंधळ, मतदारांना समजावून सांगताना अधिकाऱ्यांची होणारी दमछाक असे काहीसे चित्र कोथरूडच्या प्रभाग क्र. १0, ११ आणि १२मध्ये पाहायला मिळाले. सकाळपासून ते मतदानाच्या अखेरपर्यंत कोथरूडकरांचा मतदानाचा उत्साह कायम होता. दुपारी ३.३0 वाजेपर्यंत तिन्ही प्रभागांमध्ये जवळपास ४८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले, दोन तासांत हा आकडा नऊ ते दहा टक्क्याने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता, त्यानुसार शेवटच्या टप्प्यात कोथरूडमध्ये मतदानाचा टक्का वाढला. युती तुटल्यामुळे यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि सेनेने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याबरोबरच या भागामध्ये राष्ट्रवादी, मनसेनेदेखील मुसंडी मारल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार कंबर कसल्याचे दिसून आले. बावधन डेपो (प्रभाग क्र. १0), रामबाग कॉलनी (प्रभाग क्र.११) आणि डहाणूकर कॉलनी ( प्रभाग क्र. १२) या भागांमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. फिरायला बाहेर पडलेल्या ज्येष्ठ मतदारांनी मतदानासाठी सकाळचाच मुहूर्त साधला. दुपारच्या वेळेत छत्रपती संभाजी विद्यालयासह, शिवराय शाळा, एकलव्य कॉलेज आदी केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती. ज्येष्ठ नागरिकांसह महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडला होता. यंदाच्या निवडणुकीत चार उमेदवारांना मतदान करायचे असल्याने मशीनवर दिलेली चार बटणे दाबून मतदान करायचे होते, मात्र याबाबत बऱ्याचशा मतदारांचा गोंधळ उडत होता. मतदारांना समजावून सांगताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत होती. तरीही संयम ठेवून ते मतदारांना समजावताना दिसत होते. प्रभाग क्र. ११मध्ये एका मतदान केंद्रावर एक ज्येष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी आले होते. मतदान सुरू झाल्यानंतरच्या दोन तासांत क्र. १0, ११ व १२ प्रभागांत २५ टक्क्याच्या आसपास मतदान झाले. दुपारी ३.३0पर्यंत तिन्ही प्रभागांमध्ये ४८ टक्क्यापर्यंत मतदानाचा आकडा पोहोचला होता. पाचच्या सुमारास अनेक केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सोसायट्यांमध्ये फिरून पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी बाहेर काढत होते.
शेवटच्या टप्प्यात टक्का वाढला
By admin | Published: February 22, 2017 3:27 AM