नितीन चौधरी
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी सुमारे २ हजार १६ मतदान केंद्रांवर सरासरी ५९.५० टक्के मतदान झाले. त्यातील तब्बल ४५६ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील तब्बल १९६ तर पुरंदर विधानसभा मतदारसंघात १५७ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे बारामती विधानसभा मतदारसंघात १९ व भोर विधानसभा मतदारसंघात ७ मतदान केंद्रांवर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. दौंड मधील मात्र, ६ तर पुरंदर मधील पाच केंद्रांवर ३० टक्क्यांपेक्षा ३० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मतदानात टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
पुणे जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्यांच्या दुरुस्ती सोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, बहुतांश ग्रामीण भाग असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीचे प्रयत्न कमी पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
खडकवासलात १९६ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघ ग्रामीण भागात मोडतात. तर खडकवासला मतदारसंघ शहरी भागात येतो. अपेक्षेनुसार सर्वात कमी मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघात ५१.५५ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांची संख्या तब्बल १९६ इतकी आहे. तर, तीन मतदान केंद्रांवर ३० टक्क्यांपेक्षा देखील कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
याउलट बारामती विधानसभा मतदारसंघात सुमारे ६९.४८ टक्के मतदान झाले आहे. या विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांची संख्या केवळ ३ इतकी आहे, मात्र, ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालेले केंद्र तब्बल १९ आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. हे केंद्र बहुतांशी ग्रामीण भागातील असल्याने याठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.
पुरंदरमध्ये १५७ केंद्र ५० टक्क्यांपेक्षा कमी
खडकवासला विधानसभा मतदारसंघ नंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघात देखील केवळ ५३.९६ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात देखील तब्बल १५७ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असून ५ मतदान केंद्रांवर ३० टक्क्यांपेक्षा देखील कमी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भोर मतदारसंघात सरासरी ६० टक्के मतदान झाले असले तरी येथे ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेले ५९ केंद्र आहेत. तर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान ७ केंद्रांवर झाले आहे. तर एका मतदान केंद्र ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे उघड झाले आहे. मात्र, एका मतदान केंद्रावर ३० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले आहे.
इंदापुरात १४ मतदान केंद्रांवर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
दौंड मतदारसंघात सरासरी ६०.२९ टक्के मतदान झाले असून येथील ३४ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी तर ६ मतदान केंद्रांवर ३० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. इंदापूर मतदारसंघात सरासरी ६७.१२ टक्के मतदान झाले असून १४ मतदान केंद्रांवर ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. तर एका मतदान केंद्रांवर ९० टक्क्यांपेक्षा जास्त व ७ मतदान केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे.