राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले होते. पुणे जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा दरही जास्त होता. मात्र, जिल्ह्यात लसीकरण वाढल्यामुळे पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातही कोरोना बाधित दर गेल्या महिन्याभरापासून आटोक्यात आहे. सध्या बाधित दर हा पाच टक्क्यांच्या आतमध्ये आहे. हा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचा महत्त्वाचा वाटा आहे.
जानेवारी महिन्यात जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ग्रामीण भागात ३६ लाख २ हजार ६२४ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट होते. पुणे शहरात ३० लाख ९२७ नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते, तर पिंपरी चिंचवड परिसरातील १९ लाख ३६ हजार १५४ नागरिक असे मिळून एकूण ८५ लाख ३९ हजार ७०६ जणांचे लसीकरणाचे उद्दिष्ट प्रशासनाचे होते. यात फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य सेवक, ४५ आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य आले होते. १ हजार २८५ लसीकरण केंद्रावर जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला लसींचा पुरवठा मर्यादित होत होता. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवता येत नव्हता. लस पुरवठ्याबाबत ओरड झाल्यानंतर काही प्रमाणात पुरवठा सुरळीत झाला. गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत झाला असून, जिल्ह्यातील लसीकरणाचे एकुण उद्दिष्ट प्रशासनाने पूर्ण केले आहे. गुरुवारी तब्बल एक कोटी १४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. जानेवारीमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्टर आणि नर्स यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स आणि टप्प्याटप्प्याने ६० वर्षांपुढील, ४५ वर्षांपुढील, तर आता १८ वर्षांपुढील अशा सर्वांचे लसीकरण सुरू आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यांत ८ लाख ८४ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. मे महिन्यात ५ लाख ४३ हजार लसीकरण झाले. लाभार्थ्यांची वाढती संख्या आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लसीकरण कमी होत होते. मात्र, जूननंतर लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे मागील साडेतीन महिन्यांत तब्बल ६३ लाख लाभार्थींचे लसीकरण झाले. म्हणजे एकूण लसीकरणामधील ७० टक्के लसीकरण या साडेतीन महिन्यांत झाले.
चौकट
१५ दिवसांत पाचवेळा तब्बल एक लाखापेक्षा अधिक लसीकरण
सप्टेंबरमध्ये लसीचा मोठ्या प्रमाणात आलेला साठा आणि विविध कंपन्यांकडून राबविण्यात आलेल्या लसीकरणामुळे मागील पंधरा दिवसांत तब्बल पाचवेळा जिल्ह्यात एक लाखापेक्षा अधिक लसीकरण झाले, तर एका दिवशी तब्बल पावणेतीन लाख लसीकरणाचा टप्पा पार करत उच्चांक गाठलेला आहे.