पुणे : स्वरांचे अद्भुत लेणे लाभलेल्या आणि रसिकांच्या मनात सहा ते सात दशकांहून अधिक काळ स्वरांचे गारूड निर्माण करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांचे बालपण ‘पुण्यात’ गेले होते, हे कदाचित खूप लोकांना माहिती असेल! त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पूना गेस्ट हाउससमोरील पोरवाल सायकल मार्टच्या जवळील राजीवडेकर चाळीमध्ये १९३५ ते १९४० च्या दरम्यान त्या वास्तव्यास होत्या आणि तेव्हा त्यांचे वय होते अवघे आठ वर्षे. त्यानंतर श्रीनाथ टॉकीजजवळील वाघूलकर रेवडीवाले बोळातील एका वाड्यात मंगेशकर कुटुंब राहायला गेले.
संगीतरत्न दीनानाथ मंगेशकर यांचे कुटुंबीय १९४० ते १९४२, अशी दोन वर्षे तिथे राहत होते. त्यासंबंधीचा नीलफलकदेखील येथे पाहायला मिळतो. या वाड्यासोबत लतादीदींच्या काही खास आठवणी आहेत. या वाड्यात त्या गाणे गुणगुणत असत, असे आमचे वडील सांगत असल्याची आठवण रहिवासी सुभाष दत्तात्रय रेळेकर यांनी सांगितली.
लतादीदींचे पूना गेस्ट हाउसशी विशेष ऋणानुबंध.
लतादीदींचे आणि त्यांच्या भावंडांचे बालपण पुण्यात गेले. त्या १९३५ ते १९४५ सालादरम्यान कायम पूना गेस्ट हाउसला येत असते. माझी आत्या शांता आणि माझे मोठे काका बंडोपंत यांच्याबरोबर त्यांची मैत्री होती. माझ्या वडिलांना त्या चारूदादा म्हणायच्या. दरवर्षी त्या माझ्या वडिलांना राखीही पाठवायच्या. पुण्याशी त्यांचे नाते होतेच; पण पूना गेस्ट हाउसशी त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. माझे तीन काका, वडील आणि तीन आत्या यांच्यासोबत लतादीदी लहानाच्या मोठ्या झाल्या असल्याची आठवण पूना गेस्ट हाउसचे मालक किशोर सरपोतदार यांनी सांगितली.