पुणे : विविध मागण्यांसाठी मुंबईला निघालेल्या कर्णबधीर व्यक्तींच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना पुण्यात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयापासून ते मुंबईत आजपासून झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात कर्णबधीर व्यक्ती त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढणार होत्या. या मोर्चात सुमारे एक हजार कर्णबधीर सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून संतप्त विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. मात्र नेमक्या कुठल्या कारणाने लाठीचार्ज करण्यात आला याचा उलगडा अद्याप झालेला नाही.
मागण्या सांगताना मोर्चेकरी म्हणाले की, महाराष्ट्रात १८ लाख कर्णबधीर आहेत. सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात आम्ही अपंग किंवा अंध नसून कर्णबधीर आहोत. आमची भाषा समजू शकणारे लोक खूप कमी आहेत. आम्ही इंजिनिअरिंगसारखे व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार असताना भाषेचा अडसर असल्याने आम्हाला घेता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून मात्र भाषा दुभाजक देण्याची तयारीही दाखवली जात नाही. पोलिसांनी मात्र लाठीचार्ज झाला नसल्याचा पवित्रा घेतला आहे . पोलीस आंदोलकांशी बोलत होते. पण भाषेच्या अडसरामुळे काहीही लक्षात घेत नव्हते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.