खडकी : पुण्यातील रहदारीच्या रस्त्यावरून जाणा-या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांनी सतर्कता दाखवीत जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून पोलिसांची जादा कुमक मागविली. त्यांना काही अंतरावर सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्याकडून पिस्तूल ताब्यात घेऊन चौकशी केली. संबंधित दुचाकीस्वाराने दिलेल्या माहितीची खातरजमा केली असता, ती मान्यवर व्यक्ती म्हणजे लातूरचे उपमहापौर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचेही समोर आले. असे असले, तरी खडकी पोलिसांच्या या सतर्कतेचे कौतुक होत आहे.देविदास रामलिंग काळे (वय ४५, रा. गाळेगल्ली, लातूर) असे संबंधित पिस्तूलधारकाचे नाव आहे. काळे हे लातूरचे उपमहापौर आहेत. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी उपमहापौर काळे यांना सोडून दिले. काळे यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पिस्तुलाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
‘ते’ पिस्तूलधारी निघाले लातूरचे उपमहापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 1:25 AM