शेलपिंपळगाव : भाऊ म्हणजे कर्तव्य... बहीण म्हणजे वात्सल्य, असे हे परमपवित्र भावाबहिणींचे नाते रक्षाबंधनाच्या निमित्त दृढ होते. मात्र, समाजातील काही संस्था आगळेवेगळे सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण करतात. असे कार्य शेलपिंपळगावच्या जय हरी ग्रुपच्या महिला सदस्यांनी केले असून, ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत अशा अनाथ मुलांना राख्या बांधून त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील संपर्क अनाथाश्रमातील मुलांचा राखी पौर्णिमेचा दिवस भलताच आनंदात गेला. एरवी नातेवाइकांअभावी डोळ्यात मायेची आस धरून राहणाºया, रोखून वाट पाहणाºया अनाथ मुलांना रविवारी उच्चभ्रू समाजातील बहिणींनी राख्या बांधून मायेचा मोठा ओलावा दाखवून दिला. हातात हा पवित्र धागा बांधताना त्या निरागस मुलांच्या चेहºयावरील स्मित हास्य पाहून बहिणींनाही गहिवरून आले. आळंदी, वडगाव, घेनंद, केंदूर, चाकण, रासे, भोसे, पिंपरी, चिंचवड, निघोजे, मरकळ, चिंबळी आदी गावांमधील तरुणांचा व्हॉट्सअॅपवर ‘जय हरी’ ग्रुप आहे. सामाजिक बांधिलकीतून विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीरीत्या ते राबवितात. ग्रुपमधील महिला सदस्यांनी सलग चौथ्या वर्षी रक्षाबंधनाचा पवित्र सण अनाथ आश्रमातील ५० विशेष मुलांसमवेत साजरा करून इतरांसमोर एक चांगला आदर्श घालून दिला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी निकिता शिंदे, अनिता बर्गे, अश्विनी भुमकर, सोनाली गव्हाणे, स्नेहा बर्गे, स्वरा बवले, समृद्धी गव्हाणे, सीताराम बवले, संदीप बर्गे, स्वप्निल भुमकर, नवनाथ बवले, सनी नितनवरे, संतोष गव्हाणे हे फाउंडेशनचे सभासद उपस्थित होते.शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील संपर्क अनाथाश्रमातील मुलांना रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जय हरी ग्रुपच्या वतीने गोड जेवण देण्यात आले. त्यामुळे बहिणींनी हातात राख्या बांधून व भावांनी तोंड गोड करून आश्रमातील या विशेष मुलांना आनंद देण्याचा दुहेरी प्रयत्न केला आहे.