लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ताणतणावांचा सामना करणाऱ्या समाजाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून हसविणे म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ हास्यकवी आणि एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांच्या हास्यकवितांच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तेंडुलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते. या वेळी जोशी यांच्या हास्यकवितांचा ‘चला, हशा येऊ द्या !’ हा कार्यक्रम झाला. तेंडुलकर म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात गंभीर राहण्याची वृत्ती होती. मात्र आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्यामुळे महाराष्ट्र खळखळून हसायला शिकला. विडंबन कविता आणि विनोदी कथांच्या माध्यमातून बण्डा जोशी ही परंपरा पुढे नेत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अलीकडे विडंबनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून विडंबन म्हणजे मूळ लेखनावर केलेली टीका नसून त्या मूळ लेखनाच्या लोकप्रियतेला मिळणारी दाद असते. कारण काव्य किंवा लेखन लोकप्रिय असल्याशिवाय त्यावर विडंबन होत नाही.’’ माझ्या कारकिर्दीत रसिकांचा मोठा वाटा असून, त्यांच्या प्रतिसादाशिवाय ही कामगिरी अशक्य असल्याची भावना जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.
हसविणे म्हणजेच समाजसेवा
By admin | Published: May 10, 2017 4:21 AM