पुणे: कौटुंबिक वादामुळे न्यायालयात घटस्फोटासाठी गेलेल्या एका जोडप्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य क्लब जॉईन करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या हे दोघेही सकाळी विविध प्रकारचे हास्य योगाचे प्रकार करत आहेत. त्यामुळे हास्य योगामुळे एक संसार तुटण्यापासून वाचू शकेल का? हे पाहणे पुढील काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.सासू सुनेचे भांडण, एकत्रित कुंटुंब, चारित्र्यावरील संशय, आर्थिक परिस्थिती ,दारू पिऊन दररोज मारहाण करणे, माहेरहून पैसे आणण्यास सांगणे,लग्नापूर्वी खोटी माहिती देवून फसवणूक करणे , आजारपण आदी कारणांमुळे कौंटुबिक न्यायालयात घटफोटासाठी दावे दाखल केले जातात. त्यावर काही महिने समुपदेशन करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला जातो. मात्र, एका जोडप्याने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य योग करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी दिली आहे.कौटुंबिक कलहामुळे एका जोडप्यात वाद होत होता. मात्र,हा वाद विकोपाला गेल्यामुळे त्यांनी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यावर कौटुंबिक न्यायाधीश स्वाती चव्हाण यांच्या न्यायालयाने त्यांना हास्य योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले, असे नमूद करून टिल्लू म्हणाले, काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सध्या ते दोघे हास्य योगाचे प्रशिक्षण घेत आहेत. आयुष्य खूप सुंदर असून त्याला अधिक सुंदर करून जगले पाहिजे. हास्य योगाचे अनेक फायदे असून शारिरिक व मानसिक आजारांवर गुणकारी उपचार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. न्यायालयाकडून पाठविण्यात आलेल्या जोडप्याचा संसार तुटू नये, असाच माझा व माझ्या सहका-यांचा प्रयत्न आहे.
हास्य योगामुळे टळू शकतो घटस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:06 PM
एका जोडप्याने घटस्फोटासाठी दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना हास्य योग करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आले आहे.
ठळक मुद्देहास्य योगाचे अनेक फायदे असून शारिरिक व मानसिक आजारांवर गुणकारी उपचार