पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, बारावीपर्यंत मराठी भाषेच्या सक्तीचा कायदा करावा अशा मागण़्यांसाठी माजी आणि आजी साहित्य संमेलनाध्यक्ष पुढे सरसावले असताना त्यात आता 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या नावाचीही भर पडली आहे. ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा आहे. तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. भाषा सल्लागार समितीने अहवालाद्वारे मराठी ही अभिजात भाषा असल्याचे सिद्ध केले आहे. याबाबत जर केंद्र सरकार मान्यता देत नसेल तर राज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा आणि त्याबाबत अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी अशा आशयाचे पत्र डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे. केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्याप्रमाणे भाषा संचलनालय आहे. त्याच धर्तीवरच अभिजात मराठी भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र विभाग सुरू करावा अशी मागणी विनोद तावडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आणि विरोधी पक्षनेत्यांनाही पत्राद्वारे केली असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजही न्यायालयाची भाषा इंग्रजी आहे. भारतात कुठेही गेले तरी इंग्रजीचाच वापर होतो. लोकांचीच मागणी जर इंग्रजी शाळांची असेल तर काय करणार? ही मानसिकता बदलल्याशिवाय मराठीविषयीचे चित्र बदलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.चौकट‘‘मराठी शाळा बंद पडलेल्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, बारावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यासंदर्भातला कायदा अशा विविध विषयांवर साहित्यिकांनी आपली ठोस भूमिका जाहीर केली आहे. मात्र त्या भूमिका पुरेशा आहेत का? मराठी शिकवा असे नुसते म्हणून उपयोग आहे का? त्यातून पोटापाण्याचे प्रश्न सुटणार आहेत का? हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. आधी मराठी ही ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा व्हायला हवी त्यानंतरच लोकांचे प्रश्न सुटतील आणि ते पुन्हा मराठीकडे वळू शकतील. जे मराठी शिका असे सांगतात त्यांची मुलेच इंग्रजी भाषेत शिकतात. इतकी दुटप्पी भूमिका बघायला मिळते. जे मराठीविषयी गळे काढतात त्यांनी आपली मुले कुठे शिकतात? हे आधी जाहीर करावे,’’ असे डॉ. गज्वी म्हणाले.----------------------------------------------------------------------------------
अभिजात मराठी भाषा संवर्धन विभाग सुरू करावा : नाट्यसंमेलनाध्यक्षांचे विनोद तावडे यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 8:00 AM
केंद्राकडून मराठीला अभिजात भाषा मिळाला नाही तर मराठी संवर्धन राज्य सरकार करणार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ठळक मुद्देराज्य सरकारनेच मराठी भाषा संवर्धनासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करावा अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी ‘मराठी’ ही राज्याची मातृभाषा, तिला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास