पुणे : महाराष्ट्र आणि पाणीप्रश्न हे समीकरण आपल्याकडे वर्षानुवर्षे आहे. रेडिओच्या माध्यमातून जलसाक्षरता करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात झाली आहे.हाच विचार करून ‘जलसंवाद रेडिओ’ नावाचे ऍप ज्येष्ठ संशोधक दत्ता देशकर यांनी सुरु केले आहे.
रेडिओ म्हटले की, फ्रिक्वेन्सी किती, एएम आहे की एफएम आहे, असा प्रश्न येतो. मात्र, वेब रेडिओ हा प्रचलित रेडिओप्रमाणे व्हेव्हसवर न चालता वेबवर किंवा इंटरनेटवर चालतो. हा रेडियो मोबाइलवर अथवा संगणकावर सहजपणे ऐकू येवू शकतो. ही रेडियो सेवा निःशुल्क आहे. हा रेडियो जगात कोठेही ऐकला जाऊ शकतो. जलसंवाद रेडियो हे एक अॅप डाउनलोड केल्यास रोडियोचा लाभ घेता येतो .त्यासाठी गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन जलसंवाद रेडिओ मोफत डाउनलोड करता येईल.“
डॉ. देशकर म्हणाले, “अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून पाण्याविषयी बोलावे, या उद्देशाने पाणी विषयावर जलसंवाद वेब रेडियो सुरु करण्याचे ठरले. या रेडियोवरील कार्यक्रमात विविधता राहणार आहे. पाण्यावरील नामवंतांची भाषणे, पाण्यावरील चर्चा, मुलाखती, जलक्षेत्रातील यशोगाथा, जलक्षेत्रात कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्था यांचा परिचय, पाण्यावरील बातम्या, पाण्यावरील नाटके, गाणी, कीर्तने, देशातील व परदेशातील नद्या, धरणे, सरोवरे यांचा परिचय, विविध देशातील पाणी प्रश्न, हवामानाचे अंदाज, जलविज्ञानाबद्दल माहिती, गृहिणींसाठी पाणी वापराबद्दल छोट्याछोट्या टीपा इत्यादीच्या माध्यमातून या रेडियोद्वारे जलप्रबोधन होणार आहे. त्याचबरोबर श्रोत्यांनाही यामध्ये सहभागी होता येणार असून, आपले पाण्यावरील विचार ऑडियो क्लिपद्वारे अथवा मेलद्वारे श्रोत्यांना पाठवता येणार आहेत. हा रेडिओ माझा नाही तर समाजातील प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाला पाणी प्रश्नाबाबत काय वाटते हे आँडियो क्लिप द्वारे कळविले तर त्याचा समावेश प्रक्षेपणात केला जाईल, विचारलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातील,“ असे डॉ. देशकर यांनी नमूद केले.