मार्गसनी : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडच्या पायथ्याशी वसलेले गुंजवणे (ता.वेल्हे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कांबळे यांनी स्वखर्चातून 80 हजार रुपये खर्चून 'राजगड शिवसृष्टी' प्रकल्पाची उभारणी केली आहे.
नवीन पिढीला शिवरायांचा जीवनपट मूर्तिमंत रूपात पाहावयास मिळावा व उदयोन्मुख भारताचे सुजाण, चारित्र्यसंपन्न नागरिक घडावे व शिवरायांचे आचार विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावेत, शिवरायांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये जिद्द,चिकाटी, न्यायप्रियता वाढीस लागावी व गडकोटांचे जतन करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेतला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कांबळे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले, वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, डाएटच्या प्राचार्या खंदारे, शेंडकर, गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण शिळीमकर, केंद्रप्रमुख पोपट नलावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दगडू घाटे, उद्धव चाटे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण रसाळ पाटील, सेवानिवृत्त शिक्षक आनंदा कांबळे, रामदास गायकवाड, साधू हारपुडे तालुक्यातील शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवसृष्टी उभारणीच्या कामी ग्रामस्थ तरुण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब लिम्हण, विलास लिम्हण, विलास रसाळ, राजाराम रसाळ, बाळासाहेब दराडे, बापूसाहेब भिलारे, मोहन पडवळ यांची मोलाचे योगदान दिले. अहोरात्र जागून या सर्व ग्रामस्थांनी शिवसृष्टी उभारणी कामी मदत केली आहे. त्याचबरोबर पंचायत समितीचे सभापती दिनकर सरपाले यांनी शिवसृष्टीला मदत म्हणून पाच हजार रुपयाची मदत केली. तसेच कै. प्रकाश निढाळकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू श्री विलास निढाळकर यांनी शाळेसाठी रोख स्वरूपात रुपये 15 हजार रुपयांची मदत घोषित केली. आगामी काळातही तरुण वर्गाकडून व ग्रामस्थांकडून शाळेत एक लाख रुपयाची मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी शाळेतील शिक्षक निलेश रेणुसे, कल्याणी तावरे, शंकर रसाळ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संतोष जवंजाळ यांनी केले तर आभार मुख्याध्यापक हेमंत कांबळे यांनी मानले.