पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने सुरू केलेल्या,संपूर्ण देशातील मराठी माध्यमाच्या शाळेतील पहिल्या आणि एकमेव रेडिओ केंद्राचे उद्घाटन झाले. प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.
विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विज्ञान भारतीचे सदस्य सुबोधवाणीचे निर्मितीकार विलास रबडे यांनी मित्र प्रेमाचे प्रतीक म्हणून मित्र सुबोधचे नाव रेडिओ केंद्राला दिले आहे. स्वतःचे रेडिओ केंद्र सुरू करणारी सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही देशातील एकमेव शाळा ठरली आहे. याप्रसंगी प्रशालेचे 1970 च्या बॅचचे माजी विद्यार्थी यांनी डिजिटल क्लासरूमला भेट दिली.
याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले, कार्यक्रमाचे पाहुणे विश्वास काळे, विलास रबडे, विज्ञान भारतीचे अध्यक्ष आर. व्ही. कुलकर्णी, प्रशालेच्या शाळा समिती सदस्य 1970 च्या बॅचचे माजी विद्यार्थी देवदत्त भिशीकर, विज्ञान भारतीचे सदस्य रमेश हाते, श्रीकांत कुलकर्णी, नीला पुरोहित, प्रशालेच्या शाळा समिती अध्यक्षा आनंदी पाटील, प्रशालेचे महामात्र सुधीर गाडे, अरविंद गायकवाड आणि श्रीधर करकरे, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण गोखले यांनी प्रजासत्ताक दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सुबोध पुरोहित यांच्या शौर्याची माहिती दिली. सुबोध वाणी रेडिओ केंद्रामुळे विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्तेची दालने खुली होतील असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना लडकत व विद्या गायकवाड यांनी केले. आभार प्रशालेचे मुख्याध्यापक रामदास अभंग यांनी मानले.--------------------