-जिल्हा परिषद देणार मोफत नळजोड
पुणे:चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतीस अनुसरून जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती वस्त्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वैयक्तिक नळजोड देण्याच्या 'चवदार पाणी योजने 'चा शुभारंभ आज संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी करण्यात आला. जिल्ह्यातील शेकडो घरांमध्ये आज नळजोडणी मोहीम सुरू झाली.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वस्त्यांमधील प्रत्येक घरामध्ये जिल्हा परिषदेच्यावतीने नळजोड दिला जाणार आहे. या योजनेसाठी दहा टक्के लोकसहभागाची अट नाही. पुणे जिल्ह्यामध्ये 3606 दलित वस्त्या आहेत त्यातील 1059 वस्त्यांमध्ये घरपोच नळ जोडणी ची कामे प्रस्तावित आहेत त्यापैकी 218 वस्त्यांमध्ये नळ जोड योजनेचे आराखडे पूर्ण झाले असून या वस्त्यांमध्ये आजपासून कामाला सुरुवात झाली. त्यासाठी 5 कोटी47 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
समाज कल्याण विभाग आणि पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गेल्या काही महिन्यापासून या योजनेची आखणी केली जात होती. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे,उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे
यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार कदम यांनी चवदार पाणी योजनेच्या सुमारे अडीचशे गावांचा आराखडा तयार केला आज प्रत्यक्षात 218 गावांमध्ये या कामांना सुरुवात झाली. कमवा व शिका योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले बीबीए च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
दलित वस्त्यांमध्ये असणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना ज्या कुटुंबांकडे नळजोड नाही त्यांना मोफत नळजोड दिला जाणार आहे. दौंड तालुक्यातील शिंदे गोष्टी येथे समाज कल्याण सभापती सौ सारिका पानसरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्वशील शितोळे यांच्या हस्ते नळ जोड कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्या हस्ते नळ जोड देण्याची कामे सुरू करण्यात आली.