पुणे : राज्यात जिथे जिथे महिलाविषयक कामाची गरज आहे अशा भागात स्त्री आधार केंद्राच्या वतीने मुक्ता व्यासपीठ नावाने नवीन व्यासपीठ सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलाविषयक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. अत्याचारग्रस्त महिलांच्या पाठीशी उभे राहून याबाबतच्या आवश्यक धोरणात्मक बाबींचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे', असे प्रतिपादन आज स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे यांनी येथे केले. केंद्राच्या ३४ व्या वर्धापनदिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त 'महिला सक्षमीकरणाच्या नव्या दिशा ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन सारसबागेजवळील बाळासाहेब ठाकरे कलादालनात केले होते. त्या म्हणाल्या, 'सावित्रीबाईंनी केलेल्या महान कार्यामुळेच भारतीय स्त्रियांनी आज विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलाकरिता मागील ३४ वर्षात अनेक उपक्रम घेण्यात आले आहेत. मुली व मुलांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी केंद्राच्या वतीने तिहेरी तलाक विधेयकाला पाठिंबा व द्विभार्या विवाह पध्दतीला विरोध व दखलपात्र गुन्हा करावा अशी मागणी करण्यात आली. राज्य पातळीवर ११ जिल्हयातील व्यासपीठाची घोषणा करण्यात आली.
वाहतूक विभागाचे सहाय़्यक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे म्हणाले, 'महिलांच्या समाजातील असमान वागणूक मिळण्याला पुरुषी मानसिकताच कारणीभूत आहे. महिलांच्या तक्रारी या महिला अधिका-यांकडेच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १०९१ या मोफत क्रमांकावर तक्रार नोंदीची व्यवस्था आहे. दामिनी पथकेही शहरी भागात कार्यरत आहेत. ग्रामीण भागात मात्र याविषयी आणखी प्रभावी कामाची गरज आहे. महिलांबाबत समानतेवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.' दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त भानूप्रताप बर्गे म्हणाले , 'आपल्या आजूबाजूला महिलांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून गैरमार्गाने जात असल्याच्या घटना घडत आहेत. आंतर राष्ट्रीय पातळीवर अशा काही प्रकारच्या शक्ती काम करतात. नागरिकांनी याबाबत पोलिसांना वेळीच माहिती दिल्यास यावर उपाययोजना करता येतात. धार्मिक विद्वेष पसरवून विपरीत मार्गाला घेऊन जाणा-या शक्तींचा बिमोड करता येतो. लव्ह जिहादसारख्या घटनांना आळा घातला पाहिजे. अनेक आत्मसमर्पण केलेल्या मुलींना पुन्हा समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे प्रयत्नदेखील पोलिस करीत आहेत.' स्त्री विकास विषयाच्या तज्ज्ञ सतलज दिघे यांनी उपस्थित महिलांची गटचर्चा घेतली .
यावर सादरीकरण करतांना केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या छोटया छोटया गोष्टीचे प्रशिक्षण फार उपयुक्त होत आहे. काम करतांना आपापल्या भागात काम करण्याचा प्रयत्न केला. कायदयांची माहिती मिळाली. काम करतांना सोशल नेटवर्कचा वापर व्हावा. पोलिसांचे असहकार आहे. सिंहगड भागात महिला दक्षता समिती नाही. जागरुक व सुशिक्षित महिला त्यात असाव्यात. अशी मते महिलांनी यावेऴी व्यक्त केली. या कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, ज्योती कोटकर, मीनाताई ईनामदार, म्रुणालिनी कोठारी, अॅड. कल्पना निकम, शेलार गुरुजी, विभावरी कांबळे, अनिता शिंदे, प्रिया नारिंगे, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, गीता वर्मा, पद्मा सोरटे, कविता आम्रे आदी उपस्थित होत्या.