पिंपरी : सोने शुद्धतेचे प्रमाणपत्र म्हणजेच हॉलमार्किग होय. हॉलमार्किग हे सोने विक्री विषयातील विश्वासार्हता वाढविणारे आहे. त्यामुळे यासंबंधीचा कायदा सरकारने अमलात आणावा, तसेच सोने खरेदीतून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ऑनलाईन खरेदीचा फटका व्यावसायिकांना बसत असून, सोन्यावर होणारा सट्टेबाजार रोखायला हवा, अशी मागणी भोसरी सराफी असोसिएशने केली.
भोसरी सराफी असोसिएशनच्या पदाधिका:यांनी ‘लोकमत’च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयास भेट दिली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सचिन घोडके, उपाध्यक्ष प्रसाद भांबुर्डेकर, कैलास भांबुर्डेकर, सदस्य विनोद जैन, मदन सोलंकी, मफत जोशी आदी उपस्थित होते. या वेळी सराफी व्यवसायासमोरील आव्हाने, वाढलेली स्पर्धा, संघटनेच्या वतीने राबविले जाणारे उपक्रम, पोलीस यंत्रणोकडून होणारा त्रस विषयांवर चर्चा झाली.
पोलिसांचा जाच आणि खोटय़ा केस दाखल करण्याचे प्रमाण आजही अधिक आहे. त्यामुळे सराफी पेढय़ांना त्रस होतो. एक दिवसाचा जमा-खर्च लिहिला नसला, तरी पोलीस त्रस देतात. हा त्रस कमी व्हायला हवा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
अध्यक्ष सचिन घोडके म्हणाले, ‘‘भोसरी परिसरातील नव्वद टक्के व्यापा:यांनी संगणकीकरण केले आहे. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सोनारांचा ग्रुप कार्यरत आहे. त्यामुळे व्यवसायातील घडामोडीही समजतात. ग्राहकांनीही पक्क्या बिलाचा आग्रह धरावा. तसेच सोने दराबाबत होणारा सट्टेबाजारही थांबवायला हवा. तसेच सोन्यातून झटपट श्रीमंत होण्याची मानसिकताही कमी व्हायला हवी.
नागरीकरण वेगाने वाढल्याने मोठय़ा प्रमाणावर सराफी पेढय़ा पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे छोटय़ा पेढय़ांवर परिणाम झाला आहे. व्यवसाय कमी झाला नसला, तरी स्पर्धेचा परिणाम जाणवत आहे. सराफाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशातून असोसिएशनची स्थापना झाली. त्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. व्यवसायात सुसूत्रता आणण्याचाही प्रयत्न केला जातो. पारंपरिक सुवर्ण कारागीर हे असंघटित, असुरक्षित कामगार आहेत, त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी निधी गोळा करून त्या कारागिरांना मदतीचा हात दिला जातो. बीएसआर हॉलमार्क सोनेविक्री अनिवार्य करावी. तसेच ऑनलाइन खरेदीचा ट्रेण्ड तरुणाईत आल्याने त्याचा परिणामही व्यवसायावर होत आहे. आव्हाने वाढली असली, तरी शुद्धतेची खात्री आणि पेढय़ांवरील विश्वासार्हता अजूनही कमी झालेली नाही.’’
कैलास भांबुर्डेकर म्हणाले, ‘‘हौसेबरोबरच वेळेला मदतीस येणारी वस्तू म्हणून सोन्याला महत्त्व आहे. भोसरीची बाजारपेठ आता मोठय़ा प्रमाणावर विकसित झाली आहे. एलबीटीला सुवर्णपेढय़ांचा विरोध नाही. दसरा, दिवाळी अशा सणासुदीच्या दिवसात सुवर्णालंकार खरेदी हा ट्रेण्ड बदलत आहे. पैसे उपलब्ध झाले की, खरेदीला प्राधान्य दिले जाते. मात्र, खरेदीच्या हौसेबरोबरच गुंतवणूक करण्याचेही प्रमाण वाढले आहे.’’
विशाल जैन म्हणाले, ‘‘सोनारांनी पावतीशिवाय मोड घेऊ नये. तसेच दुरुस्तीही करू नये. सुरक्षेची काळजी सराफी व्यावसायिकांनी घ्यायला हवी. बहुतांश दुकानदार हॉलमार्क सोने विक्री करतात. मात्र, याबाबत कायदेशीर सक्ती केल्याने सुवर्णालंकार विक्रीचा व्यवसाय करणो सुसह्य
होणार आहे.’’ (प्रतिनिधी)