शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने जनसुनवाईचे आयोजन केले होते. या सुनवाईत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, जन विचारवंत नीरज जैन, कृषी पत्रकार संजय जाधव यांनी जनन्यायाधीश म्हणून काम पाहिले. राज्याचे कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. तर शेतमाल विपणन, हमीभाव, बी-बियाणे, कृषी विमा, दुधाचा रास्त भाव (एफआरपी), जैविक शेती, आधुनिक शेती इ.विषयी उमेश कंधारे, हनुमंत पवार, अप्पा अनारसे या तरुण शेतकरी प्रतिनिधींनी प्रश्नांची मांडणी केली. संगीता कामठे या शेतमजूर महिलेनेही शेतीतील कष्टकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या.
दिल्लीत सुरू असलेल्या किसान आंदोलनाला १४ जून २०२१ रोजी २०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त या आंदोलनाचे संयोजक असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी वाचवा, लोकशाही वाचवा असा नारा देऊन २६ जून रोजी देशभर पाठिंब्याच्या कृती कार्यक्रमाचे आवाहन केले होते. लोकराजा शाहू महाराज जयंतीनिमित्त कृती समितीतर्फे ही जनसुनवाई घेण्यात आली.
समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सुनवाई घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. जन सुनवाईतील निष्कर्षाचे टिपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निर्णयार्थ सादर होणार आहे.
राजेंद्र शिंदे यांनी स्वागत, तर स्वप्निल फुसे यांनी सूत्रसंचालन केले.