पुणे : कोर्ट आणि तारखा याचे अनोखे समीकरण आहे. सतत तारखा पडल्यामुळे न्याय मिळण्यास लागणारी अनेक वर्षे कित्येकांना माहिती आहेत. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती असताना एका वकील दाम्पत्याने मात्र आपल्या "लग्नाची तारीख" काही चुकून दिली नाही. ठरलेल्या दिवशी योग्य ती खबरदारी घेत त्यांचा विवाह नुकताच पार पडला. फुरसुंगीमधील वकील जोडप्याने ठरलेली तारीख पुढे न ढकलता फिजिकल डिस्टन्स ठेवून आपला शुभविवाह पार पाडला आहे. यावेळी त्यांचे मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील मंगल कार्यालये, त्यात होणारे कार्यक्रम, विवाह यांना परवानगी नाकारली आहे. तसेच अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे या जोडप्याने अगदी मोजक्या माणसांत सोशल डिस्टन्स ठेवून वैवाहिक जीवनाची सुरुवात केली आहे. गणेश हरपळे आणि श्यामल कामठे असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही व्यवसायाने वकील असून हरपळे हे शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस करतात. तर पत्नी श्यामल न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांची तयारी करत आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग होण्यापूर्वी त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे लग्नाची बरीचशी तयारी देखील पूर्ण केली होती. त्यामुळे तारीख न टाळता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव देखील होऊ दिला नाही.याबाबत अधिक माहिती देताना हरपळे म्हणाले,देशात सध्या भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचे हे संकट किती दिवसांनी टळेल याची कल्पना नाही. त्यामुळे आम्ही दोन्हीकडील प्रत्येक पाच माणसे आणि दोघांचे आई-वडील अशा मोजक्या माणसांत लग्न लावले.
* तो पैसा सामाजिक कामासाठी खर्च करणार
लग्नावेळी सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक असलेल्या सर्व खबरदार्या आम्ही घेतल्या होत्या. अगदी कमी माणसांत लग्न केल्याने आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आम्ही वाचवलेला वेळ आणि पैसा दोन्ही सामाजिक कामांसाठी खर्च करणार असल्याचे या दाम्पत्याने सांगितले.