पुणे : पुणे बार असोशिएशनचे सभासद अॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर सोमवारी रात्री झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर व जिल्ह्यातील वकील संघटना आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. अॅड. देवानंद ढोकणे यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काल त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातील गोळ्या काढण्यात आल्या आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं त्यांची अद्याप प्रकृती गंभीर आहे. व्यावसायिक कारणावरुन अथवा वैयक्तिक वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अॅड. देवानंद रत्नाकर ढोकणे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांचा भाऊ भरत ढोकणे यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. भरत ढोकणेदेखील फौजदारी तसेच कौटुंबिक खटल्यांचे कामकाज पाहतात. अॅड. ढोकणे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व वकील आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ येथे जमून आज दुपारी १२ वाजता या घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. अॅड. देवानंद आणि भरत ढोकणे यांनी काल न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर आपल्या पक्षकारांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यानंतर ते रात्री आठच्या सुमारास स्विफ्ट कारने येरवडा येथील घरी निघाले. भरत ढोकणे हे कार चालवत होते. तर देवानंद ढोकणे हे त्यांच्या शेजारी बसले होते. संगमवाडी येथील बीआरटी बसस्टॉपसमोर कार आली असताना तेथील स्पीड ब्रेकरमुळे कारचा वेग कमी झाला. ही संधी साधत पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरानं कारमध्ये डाव्या बाजूला बसलेल्या देवानंद यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या व ते पळून गेले. तीन गोळ्यांपैकी एक गोळी त्यांच्या कपाळाला चाटून गेली तर दुसरी गोळी कपाळ आणि मान यांच्यामध्ये लागली. अचानक झालेल्या या हल्ल्याने भरत गडबडून गेले. भावाला रक्ताच्या थोराळ्यात पाहून त्यांनी तीच कार तशीच इनलॅक्स अॅड बुधराणी हॉस्पिटलमध्ये नेली. तेथे देवानंद त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु झाले. रात्री शस्त्रक्रिया करुन त्यांच्या शरीरातून गोळी काढण्यात आली आहे. मात्र बराच रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी एक पुंगळी मिळाली आहे. हल्लेखोरांनी गोळीबार नेमका कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हल्लेखोरांच्या तपासासाठी गुन्हे शाखेची पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहेत.
वकिलावरील गोळीबाराच्या निषेधार्थ आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 9:55 AM