पुणे : हैद्राबाद येथे 27 वर्षीय डाॅक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली हाेती. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील वकिलांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच आराेपींना लवकरात लवकर कठाेरातील कठाेर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
हैद्राबाद येथील एका 27 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केला. बलात्कारानंतर त्या तरुणीचा खून करुन तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आला. ही घटना समाेर येताच देशभरात संतापाची लाट पसरली. या घटनेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत तीन पाेलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पाेलिसांनी विविध टीम तयार करुन 48 तासात आराेपींच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर साेशल मीडियावर देखील माेठा संताप व्यक्त करण्यात आला. अनेक शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली.
आज पुणे बार असाेसिएशनच्या वकीलांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. हा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालून आराेपींना कठाेरातील कठाेर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यात महिला वकीलांचा सहभाग माेठा हाेता. ही घटना समाेर आल्यानंतर महिला वकीलांमध्ये संतापाची लाट पसरली हाेती. त्यातूनच निषेध करण्याचा विचार समाेर आला. यावेळी पुणे बार असाेसिएशनचे अध्यक्ष अॅड श्रीकांत आगस्ते, अॅड उपाध्यक्ष राहुल कलारे, अॅड शिरीष शिंदे, एन. डी. पाटील, अॅड सागर नेवसे, अॅड सचिन हिंगणेकर, अॅड राणी सोनवणे, अॅड वैशाली शिंगवी, अॅड स्मिता पाडोळे, अॅड चारू कोयाळीकर, अॅड वनमाला अनुसे, अॅड फेहमिना शेख, अॅड अनिषा फणसळकर आदी उपस्थित हाेते.