पुणे : कचऱ्यालाही आपल्याकडे लक्ष्मीचा मान आहे. तिची योग्य प्रकारे पूजा केली तर ती ‘महालक्ष्मी’ होऊ शकते; अन्यथा तोच कचरा ‘महामारी’ होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर कचऱ्यातून ‘लक्ष्मी’ मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सांसद आदर्श गावांमध्ये घनकचरा प्रकल्प राबविला जाणार आहे. परिसरातील ७१ गावांना याचा फायदा होणार आहे.जिल्हा परिषदेच्या दक्षता समितीची बैैठक आज झाली. अध्यक्ष स्थानी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील होते. आढळराव व जिल्हाधिकारी यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना कचऱ्यातून अर्थार्जनाची संधी मिळवून देण्याची संकल्पना पुढे आली आहे. ‘गंगोत्री’ या संस्थेने याबाबत प्रस्ताव सादर केला असून, त्यांच्या माध्यमातून हे घनकचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सांसद आदर्श गाव केंदूबिंदू मानून परिसरातील १५ किलोमीटर अंतरातील साधारण १५ गावे यात सहभागी करून घेतली जाणार आहेत. आठ सांसद आदर्श गावांच्या परिसरातील ७१ गावांना याचा फायदा होईल. ज्या गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, त्या गावातच एका उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात येईल. तिला गावाचे नाव दिले जाईल. यात गावाचे सरपंच, प्रथितयश ग्रामस्थ व तज्ज्ञ यांचा समावेश असेल. १५ संचालक राहणार असून, १२ गावांतील व ३ प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीचे संचालक असतील. साधारण दररोज १५ टन ओल्या कचऱ्याची उपलब्धता त्यासाठी आवश्यक असेल. सुरुवातीला आढळराव-पाटील यांनी त्यांनी दत्तक घेतलेल्या शिरूर तालुक्यातील करंदी गावात हा प्रकल्प राबविण्यात येणार होता त्यानंतर सर्वच सांसद आदर्र्श गावांमध्ये का राबवू नये, असा विचार पुढे आला व तसा प्रस्ताव केला आहे. या सादरीकरणानंतर आढळराव-पाटील यांनी आपल्याकडे मोठी गावे आहेत. कचरा कुठे टाकायचा, यावरून वाद होत आहेत. हे वाद टाळण्यासाठी मोठ्या गावात जागा उपलब्ध करून दिल्यास १० ते १२ गावे एकत्र करून हा प्रकल्प तेथे राबविता येईल, अशी सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद व मुख्याधिकारी कांतिलाल उमाप यांना केली. याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, गंगोत्री कंपनीचे किरण पटवर्धन यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा प्रकल्प आपण राबवू शकतो, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांना कचऱ्यातूनही मिळणार ‘लक्ष्मी’
By admin | Published: October 02, 2015 12:42 AM