बारामती : पिण्याच्या पाण्यासह रस्ता, भूमिगत गटारांसाठी आंदोलन करणाऱ्या बारामती शहरातील कसबा भागातील लक्ष्मीनारायणनगर, लहुजीनगर, यशवंतनगरी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सोमवारी यासाठी १३ लाख रुपये खर्च करून पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागातील नागरिकांनी पाण्यासाठी अनोखे आंदोलन केले होते.बारामती शहरातील कसबा परिसरातील लक्ष्मीनारायणनगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवस प्रलंबित होता. याबाबत नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी या परिसरातील नागरिकांशी चर्चा करून १५ ते २० दिवसांत कायमस्वरूपी पाणी देण्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज तब्बल १३ लाख रुपये खर्चाच्या पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून लक्ष्मीनारायणनगर येथील पाणीपुरवठा पाईपलाईनच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बारामती बँकेचे संचालक सचिन सातव, नगरसेवक विक्रांत तांबे, शाम इंगळे, पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, सुनीता चव्हाण, प्रतिभा खरात, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, विजय खरात, सुजय रणदिवे, जितेंद्र जाधव, सुयश बगाडे, मोहन मोरे, बबलू शेख, चिऊशेठ जंजिरे, प्रगती देवकाते, सरला मोरे, प्रमोद फडतरे आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. पक्षनेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रत्यक्ष कामावर भर दिला जात असल्याचे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतर महिनाभरातच पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन जगताप यांनी दिले होते. त्यासाठी मुख्याधिकारी नीलेश देशमुख, पाणी पुरवठ्याचे अभियंता विजय सूर्यवंशी यांच्यासह या भागाचे नगरसेवक विक्रांत तांबे, बारामती बँकेचे संचालक सचिन सातव, पाणीपुरवठा सभापती शैलेश बगाडे, प्रतिभा खरात, शाम इंगळे, सुनीता चव्हाण, विजय खरात आदींचे योगदान महत्त्वाचे होते. प्रशासनाने लक्ष्मीनारायणनगर येथील पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढल्याबद्दल नगराध्यक्ष जगताप यांनी आभार मानले. (वार्ताहर)
लक्ष्मीनारायणनगरचा पाणीप्रश्न सुटणार
By admin | Published: March 08, 2016 1:17 AM