‘कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 18:03 IST2025-01-11T18:00:13+5:302025-01-11T18:03:54+5:30
बारामती : राज्य शासनाने पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांबाबत कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील ...

‘कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’ उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
बारामती : राज्य शासनाने पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांबाबत कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा विभागानिहाय आढावा मुख्यमंत्री घेत आहेत. देण्यात येणाऱ्या निर्देशाचे सर्व संबंधित विभागांनी पालन करावे. या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पवार पुढे म्हणाले, नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करा, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्या. नागरिकांना घरपोहोच सेवा उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करावे. नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, सर्व संबंधित विभागांनी पुढील १०० दिवसांत ठोस कामगिरी करून राज्यात एक क्रमांकाचा तालुका राहील, या दृष्टीने प्रयत्न करावेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजन करावे, याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करा, असे निर्देश पवार यांनी दिले.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, आदी उपस्थित होते.