पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या सभागृह नेत्यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने पुण्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मात्र शहरातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याकरिता ही भेट झाल्याचे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शहरातील राजकीय पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपा आपल्या कामांचा लेखाजोखा मांडत आहे. तर, राष्ट्रवादीकडून प्रलंबित प्रकल्पांबाबत टीका केली जात आहे. नुकतेच भामा आसखेड पाणी योजना आणि 23 गावांच्या समावेशावरुन दोन्ही पक्षात ‘ॲक्शन-रिॲक्शन’चा खेळ रंगलेला आहे. त्यातच पालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नवीन चर्चेला तोंड फोडले आहे.
राज्यात महाविकास आघाडी आणि पालिकेत भाजपाची सत्ता आहे. शहरातील नदी सुधारणा, मेट्रो प्रकल्प, एचसीएमटीआर आदी प्रकल्पांना गती देणे आवश्यक आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपला राज्य शासनाच्या मदतीची गरज भासणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिडकर यांनी पवार यांची शनिवारी सकाळी सातला भेट घेतली. या भेटींने राजकीय वतुर्ळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. मात्र, बिडकर यांनी त्यांचे खंडन करीत ही भेट केवळ शहराच्या विकासाच्या संदर्भांत होती असे स्पष्ट केले.
====
पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता पुन्हा एकत्र येणार आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेसाठी नाही, तर शहरातील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकत्र येणार आहेत. विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. शहराच्या विकासकामांत कोणतही राजकारण न आणता विविध योजना आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादीकडून तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल असे आश्वासन पवार यांनी दिले.
- गणेश बिडकर, सभागृह नेते
फोटो - पालकमंत्री अजित पवार यांच्या समवेत सभागृह नेते गणेश बिडकर