पुणे : शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडून या पक्षातील गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. लांडग्यांच्या कळपात गेलेल्यांना लांडगेच सोडणार नाहीत. लोकांना हे आवडलेले नाही. काँग्रेसवर लोकांचा विश्वास आहे. या स्थितीत स्वबळावर राज्यात काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
पुणे दौऱ्यावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी रविवारी काँग्रेस भवनला भेट दिली. त्यांची विरोधीपक्षनेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल शहर काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चौधरी , संगिता तिवारी यांच्यासह काँग्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, जनतेचा आता फक्त काँग्रेसवर विश्वास आहे. आमचे मित्र पक्षातील काही जण सत्तेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसला संधी निर्माण झाली आहे. पुणे शहरातून चार आमदार निवडूण येतील. काँग्रेसची ताकद कमी असताना ४४ आमदार निवडून आले होते. तेव्हा शहरात गाफील राहिले नसतो तर तेव्हाच चांगले यश मिळाले असते.
पंतप्रधान, अजित पवारांवर टिका
वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मागील एक कार्यक्रमात त्यांचाच पाठीवर पंतप्रधान हात फिरवत होते.
काँग्रेस भवनला भेटवरून नाराजीनाट्य
काँग्रेस पदाधिकारी,नेते हे पहिल्यांदा शहरात आले तर त्यांनी काँग्रेस भवनला भेट देणे अपेक्षित आहे. तसा प्रोटोकॉल देखील आहे. मात्र, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदाराच्या निवस्थानी भेट दिली. त्यानंतर एका कार्यक्रमाला देखील हजेरी लावली. त्यानंतर ते काँग्रेस भवनला भेट दिली. त्यावरून काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
राज्यात काँग्रेस सत्तेत स्वबळावर येईल
मित्रपक्षांसाठी शहर काँग्रेसवर अन्याय शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, शहरात राष्ट्रवादी, शिवसेना आंदोलन करत नाहीत. काँग्रेस हा आंदोलन करणारा एकमेव पक्ष आहे. मित्र पक्षांसाठी कायम शहर काँग्रेसवर अन्याय झाला आहे. शहरात मित्र पक्षाला अडचण होते म्हणून शहरातून मिळालेली मंत्री पदे सुद्धा काढून घेण्यात आली. पक्ष वाढ करताना देखील राष्ट्रवादीच्या तथाकथित नेत्यांना दचकून काम करण्यात आले. मात्र, सत्यासाठी विरोधीपक्षनेते वडेट्टीवार कोणालाही अंगावर घेतात त्यामुळे आता आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ते शहर काँग्रेसला ताकद देतील.