बिबवेवाडी (पुणे) : स्वारगेट परिसरात दहशत माजविणाऱ्या कोयता टोळीतील १४ जणांना स्वारगेट पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. मात्र, त्यांचा म्होरक्या फरार होता. टोळी प्रमुख सचिन माने मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि जाळ्यात सापडला. घोरपडी पेठेत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फिल्मी स्टाइलने त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून कोयते, कुऱ्हाड, पालघन यासारखी घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दिवशी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने दुसऱ्या टोळीवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला केला होता. त्या दिवसापासून या घटनेतील आरोपी फरार होते. त्यांच्यातील काहींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली. सचिन मानेचा शोध सुरू होता. माने घोरपडे पेठेत मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी पहाटेच्यावेळी सापळा लावून मानेला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर कोयता उगारला. झटापटीत पोलिस कर्मचारी शिवा गायकवाड जखमी झाले. तरीही मानेला पकडण्यात पोलिसांना यश आले.
स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी यासारखे १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर तसेच पोलिस निरीक्षक गुन्हे सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस हवालदार मुकुंद तारू, पोलिस अंमलदार शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण, प्रवीण गोडसे, संदीप घुले यांनी दिवसरात्र सदर गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर वॉच ठेवून आरोपी निखिल पेठकर व त्याच्या इतर साथीदारांना पाठलाग करून घातक हत्यारासह पकडून अटक केली आहे.