राज्यातून नेत्यांसह समर्थक बारामतीत; पवार कुटुंबियांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गोविंदबाग’ गजबजली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 12:53 PM2022-10-26T12:53:07+5:302022-10-26T12:54:00+5:30
यंदा कोविड संकट दूर झाल्याने गोविंदबाग चांगलीच फुलल्याचे चित्र होते
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार,विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय त्यांची दिवाळीनिमित्त बारामतीत असतात. यानिमित्त सर्व कुटुंबिय एकत्र येतात. यावेळी सर्वजण पाडव्यानिमित्त गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. हि परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासुन जपली आहे. बुधवारी (दि २६) पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज्यातुन गर्दी झाली होती. यावेळी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र होते. शेकडोंच्या संख्येने वाहनांची गर्दी झाली होती.
कोविड संकटात पाडवा शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुलली नसल्याचे चित्र होते. यंदा कोविड संकट दूर झाल्याने गोविंदबाग चांगलीच फुलल्याचे चित्र होते. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार शरयु कारखान्याचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार सकाळी ८ वाजल्यापासुन शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, पार्थ पवार यांची देखील यावेळी उपस्थिती होती. यावेळी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यासाठी राज्यातील ‘व्हीआयपी’ देखील रांगेत होते. आमदार दत्तात्रय भरणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार यशवंत माने, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार रमेश थोरात आदी बड्या नेत्यांनी पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
राज्यभरातुन आलेल्या वाहनांच्या रांगा लाबल्या होत्या. परिसरातील दोन किलोमीटरचे रस्ते वाहनांच्या ‘पार्किंग’ने भरुन गेले होते. कार्यकर्ते केवळ शुभेच्छा देण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत थांबल्याचे चित्र होते. आज झालेल्या गर्दीमध्ये युवकांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. यावेळी अनेकांनी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर छायाचित्र, सेल्फी काढण्याची संधी साधली.