भानुदास पऱ्हाड
आळंदी : औद्योगिक वसाहतींमधील घातक रसायनमिश्रित पाणी व कचरा इंद्रायणीच्या उदरात मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. तर मैलामिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे नदीपात्रात सोडले येत आहे. मात्र हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आजवरचे नगरपरिषदेचा कारभार हाकणारे नेते तसेच प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आळंदी शहाराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजतागायत सुटू शकला नाही ही गंभीर बाब आहे.
इंद्रायणीच्या काठावर वसलेल्या अलंकापुरी शहराची लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तर शहरालगतच्या पश्चिमेला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचीही लोकसंख्या लाखांच्या पुढे आहे. तर ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत विविध कारखाने सुरू आहेत. परिणामी या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या-ज्या उद्योगात किंवा व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतर रसायनमिश्रित पाणी विनाप्रक्रिया सरळसरळ इंद्रायणीच्या नदीपात्रात छुप्या मार्गाने सोडले जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.
पिंपरी चिंचवड व आळंदी शहर विकासासाठी गेल्या अनेक वर्षांत विविध विकास आराखडे तयार करण्यात आले. त्यातून अनेक विकासकामांसह गटारींची कामे करण्यात आली. मात्र या गटारींमधून वाहून जाणारे सांडपाणी योग्य ठिकाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही न झाल्याने लाखो लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया थेट इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही शहरांतील वाढती लोकसंख्या गृहीत धरून चांगल्या पाण्याची मागणी करण्यात आली. परंतु सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी आळंदीचे वैभव असणाऱ्या इंद्रायणीची अवस्था बिकट होऊन पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत आहे.
अलंकापुरीत माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी नित्याने राज्याचा कारभार हाकणारे वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी येत आहेत. 'श्रीं'चे दर्शन घेतल्यानंतर सर्वच राजकीय नेते व प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी इंद्रायणी नदीची पाहणी करून चिंता व्यक्त करतात. विशेष म्हणजे इंद्रायणीला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तत्काळ उपाययोजना कार्यान्वित करण्याच्या अनेक जबाबदार नेत्यांनी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र या सर्व सूचना आजतागायत फक्त आश्वासन बनून हवेत विरल्या आहेत.
" इंद्रायणीत पिंपरी-चिंचवड शहरातून सांडपाणी व घातक रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात अभ्यासपूर्ण कृतिशील कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नदीतील पाणीप्रदूषण वाढत चालले आहे.
-
निसार सय्यद, अविरत फाऊंडेशन आळंदी.
" इंद्रायणीच्या स्वच्छतेसाठी पाऊले उचलली जातील. पिंपरी-चिंचवड हद्दीतील सांडपाणी रोखण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे.
-
अंकुश जाधव, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.
आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याची तसेच नदीपात्राची झालेली भयावह अवस्था.