पिंपरी : परदेशातून आलेल्या शिष्टमंडळाला रायगडाविषयी आकर्षण आहे. मात्र, मी सर्वच पक्षांतील नेत्यांना परदेशी सहलीसाठी सहपरिवार जाताना पाहिले आहे. मात्र, काही मोजके नेते वगळले तर इतर नेते रायगडाला भेट देत नाहीत, अशी खंत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. पहिले इंद्रायणी साहित्य संमेलन मोशी येथे पार पडले. या संमेलनाच्या समारोपावेळी दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
संदीप तापकीर यांनी विश्वास पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून पाटील यांनी आपली लेखक म्हणून वाटचाल आणि पुस्तकांसाठी निवडलेल्या विषयांबाबत भाष्य केले. पाटील म्हणाले की, कमी वयात लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली. मात्र, मी लेखक म्हणून घडण्यात माझ्या गावाचा आणि आसपासच्या परिसराचा मोठा वाटा आहे. मी ज्या परिसरात लहानाचा मोठा झालो त्याच परिसरातून शिवाजी महाराज, बाजीप्रभु देशपांडे हे विशालगडाकडे गेले होते. मला नागरिकांच्या कहाण्या वास्तव लिखाणातून सांगण्यास आवडते. माझ्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांनी प्रचंड प्रेम केले. पूर्वी सिनेमासारख्या कलाकृतीतून शिवाजी महाराज यांना जातीधर्मात, एका प्रदेशापुरता बांधायचा प्रयत्न झाला. महाराजांची प्रतिमा ही संकुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाजी महाराज मी अभ्यासत गेलो तसे ते यापलीकडे होते याची जाणीव मला झाली. स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांनी जिजाऊ आणि शहाजीराजांपासून घेतली. शहाजीराजांनी स्वत: स्वराज्य स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता.
व्हिएतनामपुढे शिवाजी महाराजांचा आदर्श
व्हिएतनामने अनेक वर्षे अमेरिकेशी संघर्ष करून त्यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. त्यासाठी व्हिएतनामच्या क्रांतिकारच्यासमोर शिवाजी महाराजांचाच आदर्श होता. ज्यांनी बलाढ्य शत्रू विरोधात लढा देऊन स्वराज उभारले, असे पाटील यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.