जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ९ हजार ३७६ लोकांचे लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या काही दिवसांत शहरी भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ग्रामीण भागात मात्र रुग्ण वाढत असताना दिसत आहेत. असे असले तरी पुणे जिल्ह्यात शहरी भागापेक्षा रुग्णांचे ट्रेसिंग आणि लसीकरण शहरी भागांपेक्षा खूप चांगले आहे. यात जिल्ह्यात खेड, जुन्नर तालुक्यात तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक पात्र लोकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ९ हजार ३७६ लोकांचे लसीकरण झाले.
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीचे पंधरा दिवस पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली होती. त्या तुलनेत ग्रामीण भागात मात्र तेवढ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नव्हता. परंतु राज्यशासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केल्यानंतर शहरी भागात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. शहरी भागात तुलनेत लाॅकडाऊनची अंमलबजावणी केली केली. याच वेळी ग्रामीण भागात त्या तुलनेत लाॅकडाऊनची अंमलबजावणी होताना दिसली नाही. शासनाने केवळ अत्यावश्यक वास्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली असताना ग्रामीण भागात चप्पल, कपड्यांपासून सर्वच दुकाने ११ पर्यंत सुरू ठेवली जात होती. याशिवाय लग्न, दशक्रिया विधी व अन्य कार्यक्रमांना छुप्या पद्धतीने शेकडो लोकांची उपस्थितीती देखील कायम होती. या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण भागात विविध उपाययोजना करूनदेखील केवळ लाॅकडाऊनची योग्य अंमलबजावणी न झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या शहरी भागापेक्षा वेगाने वाढत गेली. ही बाब प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आल्यानंतर मात्र कडक निर्बंध व अंमलबजावणीकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. याचा परिणाम देखील दिसत असून गेल्या दोन-तीन दिवसांत ग्रामीण भागातदेखील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
-------
- जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्ण : ९१,९५०
- रुग्णालय उपचार घेत असलेले रुग्ण : २८,१८९
- ग्रामीण भागातील उपचार घेत असलेले रुग्ण : ११,३८९
---------
पुणे जिल्ह्यात टेस्टिंग व ट्रेसिंगवर अधिक भर
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी काॅन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रेसिंगवर सुरुवातीपासूनच अधिक लक्ष दिले जात आहे. एखाद्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्वरित घरातील सर्व लोकांची टेस्ट केली जाते. तसेच संपर्कातील अन्य लोकांचेदेखील अशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत ट्रेसिंग देखील केले जाते. सध्या जिल्ह्यात सरासरी १०-१४ लोकांचे ट्रेसिंग केले जाते.
---------
जिल्ह्यात असे झाले लसीकरण
- एकूण पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण : १०,०९,३७६
- पहिला डोस घेतलेले नागरिक : ८,७२,१४४
- दुसरा डोस घेतलेले नागरिक : १,३७,२२९
-------
आरोग्य कर्मचारी : ४६,९८७ (अपेक्षित)
- पहिला डोस : ४८,२७८ (१०३%)
- दुसरा डोस : २२,७७७ (४८%)
--------
फ्रंट लाइन वर्कर्स : ७३१२५ (अपेक्षित)
पहिला डोस : ८४८४३ (११६%)
दुसरा डोस : ३०६६७ (४२%)
-------
४५ वर्षांवरील : १४,११,१३४ (अपेक्षित)
पहिला डोस : ७,३१,८६५ (५२%)
दुसरा डोस : ८३,७८५ (६%)
-------
ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग चांगला
पुणे जिल्ह्यात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात लसीकरण चांगल्या प्रकारे सुरू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत दहा लाखपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. यात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आल्यानंतर पहिले पाच-सहा दिवस अपेक्षित लसींचे डोस उपलब्ध होत नव्हते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा नियमित म्हणजे दिवसाला २५-३० हजार डोस उपलब्ध होत आहेत. लस योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्याच ग्रामीण भागातील लसीकरणाचा वेग असाच कायम राहील.
- डाॅ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी