पुणे : नैसर्गिक आपत्तींनाना सामोरे जात जात पक्षाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. सोशल मिडीयाचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे असून पदाची अपेक्षा न ठेवता नेता बनण्याआधी कार्यकर्ता व्हायला शिका असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
पालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गटनेते आबा बागुल यांनी पालिकेच्या आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीला १९९२ ते २०१७ या कालावधीतील ८० हून अधिक आजी माजी नगरसेवक, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, काका धर्मावत, भीमराव पाटोळे, संगीता तिवारी, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते.
शिवरकर म्हणाले, नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसाठी स्वतंत्र महापालिका अस्तित्वात आणावी. त्यामुळे या भागाचा विकास होईल. या गावांचा विकास खुंटला आहे. तर, मोहन जोशी म्हणाले, पालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासून सुरुवात करावी. तर, डॉ. देसाई म्हणाले, कॉंग्रेस पक्षाचा मुख्य शत्रू हा कॉंग्रेसच आहे. पक्षाला उभारणी देण्यासाठी पालिकेच्या स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी पालिकेचा ९१८ कोटीचा हिस्सा असणार आहे. परंतु, मुंबई पालिकेचे ४० हजार कोटी बजेट असून देखील मुंबई व नागपूर या दोन्ही महापालिकांनी कुठलेही पैसे मेट्रो प्रकल्पासाठी दिलेले नाहीत. पालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी आपला हिस्सा का द्यावा असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेने हिस्सा देऊ नये यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे बागुल म्हणाले. पीएमपीएमएल कंपनी तयार होऊनही ती तोट्यात आहे. पीएमपीएमएलच्या तुटीपोटी दरवर्षी २०० कोटी निधी द्यावा लागत आहे. एचसीएमटीआर प्रकल्प उभारणे, शहरातील २००० किमीचे रस्ते रुंद करणे आदी विषयांवर बागुल यांनी मत मांडले. किराड यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.