राहुल शिंदे
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठतर्फे ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे नावीन्यपूर्व व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम लवरकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक व राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या सहकार्य व सहभागाने तयार केलेले वैशिष्टपूर्ण ‘डीग्री प्ल्स’ अभ्यासक्रम येत्या 1 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. परिणामी पदवी प्राप्त करतानाच विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात करणे शक्य होणार आहे.
विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना विविध कौशल्ये आत्मसात करवा यावीत या उद्देशाने विद्यापीठाने ‘डीग्री प्ल्स’ हा महत्त्वकांक्षी उपक्रम हाती घेतला. त्यामुळे केवळ पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यापीठाने उपलब्ध केलेले डीग्री प्ल्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची रोजगार मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
ज्वेलरी डिझायनिंग, सेल्स इक्झिकेटेव्ह, म्युझिअम क्यरेटर,आयुर्वेदिक मसाज आदी कौशल्य अभ्यासक्रम विद्यापीठाने तयार केले असून डीग्री प्ल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना काही अभ्यासक्रम ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने पूर्ण करता येणार आहेत. विद्यापीठाकडून सध्या सर्व अभ्यासक्रमांना कौशल्य विकास मंत्रालयाकडून मान्यता घेण्याची प्रक्रिया केली जात आहे. परंतु, सर्व अभ्यासक्रम तयार असून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याबाबत ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्यातील एक ते दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. सिंप्ली लर्न, अॅमेझॉन व इतर व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक अभ्यासक्रम उपलब्ध होत आहेत. त्यात हार्वर्ड बिझनेस स्कूल अभ्यासक्रमांची भर पडणार आहे.
''हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कात उपलब्ध करून देण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे,असे सूत्रांनी सांगितले.''
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कमी शुल्कात पूर्ण करता यावेत, याबाबत चर्चा सुरू
''विद्यापीठातर्फे येत्या 1 डिसेंबरपासून डीग्री प्लस अंतर्गत विविध अभ्यासक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले जातील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर काही अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. तसेच हार्वड बिझनेस स्कूल अंतर्गत वैशिष्टपूर्ण व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कमी शुल्कात पूर्ण करता यावेत, याबाबत चर्चा सुरू आहे असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.''