पुणे : कोरोनाच्या साठीमुळे लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. महापालिकेच्या शाळाही बंद आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 'लर्न फ्रॉम होम' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पांतर्गत पालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या मराठी व इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास पूरक असे एज्युमित्र अॅप उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. या अॅपसाठी ७० हजार १३९ विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वतंत्र लॉगइन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
शाळेतील बहुतांश वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गाचे व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केलेले आहेत. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे व्हॉट्स अॅप ग्रुप अद्याप तयार केले नसतील अशा उर्वरित सर्व शाळांनी हे ग्रुप तयार करण्याबात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी पालकांचे मोबाइल क्रमांक शिक्षकांना पाठविण्यात आले आहेत. या ग्रुपच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना एज्युमित्र अॅप डाऊनलोड करण्याबाबतच्या सूचना देणे तसेच त्यासाठी आवश्यक लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यासोबत अॅपचा वापर कसा करावा याबाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे. या अँपच्या मदतीने विद्यार्थ्यांना हव्या त्या वर्गाचा व हव्या त्या विषयाचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थी स्व-अध्ययन करू शकणार आहेत. इंग्रजी व गणित या विषयांचा अभ्यास सहज व सोपा व्हावा यादृष्टीकोनातून स्पोकन इंग्लिश आणि मॅथमॅटीक लॅब या सारख्या संवादी पद्धतीने शिकण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांमधे वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने ई-लायब्ररीच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांबरोबरच हजारापेक्षा अधिक पुस्तके अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.