पुणे : सतत नव्या भाषा शिकल्याने वेगवेगळ्या संस्कृतीची देवाणघेवाण होते, दोन संस्कृतींमधील एकोपा वाढीला लागतो, असे मत दिल्ली येथील जपान फाउंडेशनचे संचालक कोजी सातो यांनी व्यक्त केले.
डेक्कन कॉलेजच्या भाषाशास्त्र विभागात शनिवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कोजी सातो यांच्यासह इराण कल्चर हाउस, मुंबईचे संचालक मोहसेन अशौरी, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू प्रसाद जोशी उपस्थित होते. कुलपती डॉ.अरविंद जामखेडकर अध्यक्षस्थानी होते.
विभागातील विद्यार्थ्यांनी, तसेच मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण या प्रकल्पातील प्रकल्प सहायकांनी गुजराती, मुंडा, हिंदी, मराठी, उर्दू, इराणी, काश्मिरी आणि मराठीच्या बोलींमधील कविता, गाणी आणि नाटक सादर केले. भाषाशास्त्र विभागात सुरू असलेल्या इटालीयन, इराणी आणि जपानी भाषा शिकविण्याच्या उपक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे यावेळी जाहीर करण्यात आली. अशौरी यांनी भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी इराणी भाषा माहीत असणे आवश्यक आहे, असे सांगितले. विभागाच्या प्रमुख सोनल कुलकर्णी-जोशी यांनी स्वागत केले. डॉ.शुभांगी कर्डिले यांनी आभार व्यक्त केले.