लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लिव्ह अँड लायसन्सी (भाडेकरार) नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. इतर व्यवहारांची दस्तनोंदणी करण्यासाठी आगाऊ अपॉइंटमेंट घेऊनच करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नोंदणी महानिरिक्षकांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु, अद्यापही सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दस्तनोंदणी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यातील लिव्ह अँड लायसन्स दस्तांची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद केली आहे. नियमित दस्त नोंदणीसाठी देखील अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.
नोंदणी महानिरीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व दस्तनोंदणीच्या सोईसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी, असे म्हटले आहे.
आता अशी करता येईल दस्त नोंदणी
- नागरिकांनी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्तनोंदणीकरता पीडीईद्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य केलेले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. डाटा एंट्री करणे अनिवार्य केलेले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत.
- पीडीई डेटा एंट्री करून दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर eStep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईनद्वारे किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही.
- नागरिकांनी दस्तातील मािहती घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच भरावी. प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वतःचे पेन आणणे. एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये. मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.
- विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येणार आहे.
- दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा.मुंबई ठाणे पुणे व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरु आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहतील. जी दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरु होती त्यांचे कामकाजही कडक लॉकडाऊनमुळे बंद राहणार आहे.