पुणे: कोरोना अनलॉक काळात आरक्षित केलेले मुंजीचे कार्यक्रम तरी होऊ द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनने महापालिका आयुक्तांकडे केली.
असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी सांगितले की, मध्यंतरी कोरोनाबाबतचे सार्वजनिक कार्यक्रमांसाठीचे नियम शिथिल करण्यात आले. त्या वेळी अनेक कुटुंबांनी नियमांचे पालन करत आपल्या पाल्यांच्या मुंजीसाठी सभागृह, आचारी याचे आरक्षण केले. आता कोरोना वाढू लागल्याने पुन्हा सर्व अटी लागू करून सार्वजनिक कार्यक्रम तर रद्दच केले आहेत. त्याचा फटका आरक्षण केलेल्या कुटुंबांबरोबरच सभागृहाचे मालक, केटरिंगवाले यांनाही बसतो आहे.
पोलिसांची परवानगी घ्यायला गेले तर ते लगेच नकार देतात. मुंज हा विधी घरगुती स्वरूपात, मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत करतात. त्यातही आरोग्यविषयक सर्वच नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे किमान आधीच तारीख ठरवलेल्या मुंजीच्या कार्यक्रमांना तरी परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनने आयुक्तांची भेट घेऊन केली. आयुक्तांनी यावर विचार करण्याचे आश्वासन देत यासंबंधी कळवण्यात येईल, असे सांगितले असल्याची माहिती सरपोतदार यांंनी दिली.