पुणे : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे. सन 2023-24 या नव्या शैक्षणिक वर्षात 12 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. दरम्यान, विदर्भातील शाळा मात्र 26 जूनपासून सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी उन्हाळी सुट्टीबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता पहिली ते नववी, अकरावी यांचा निकाल 30 एप्रिल रोजी अथवा त्यानंतरच्या सुट्टीच्या कालावधीत लावता येणार आहेत.
निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही संबंधित शाळांवरच सोपविण्यात आलेली आहे. 11 जूनपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळसारख्या सणांप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने घेण्याबाबत आवश्यक ते निर्देशही देण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षातील सर्व सुट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
मोबाईल सोडा अन् खेळांवर भर द्या
उन्हाळी सुट्टीत मैदानी खेळ, कला, नृत्य, अशा गोष्टींवर मुलांनी भर द्द्यावा असे पालकांना वाटत असते. परंतु सद्यस्थितीत असंख्य मुले मोबाईलच्या जाळयात अडकली आहेत. दिवसभर ते हातात मोबाईल घेऊन बसत आहेत. त्यामुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. तरी येणाऱ्या उन्हाळी सुट्टीत मुलांनी खेळांबरोबरच कला, नृत्य, नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा. असा सूर पालकवर्गातून उमटत आहे.