भिगवण : खडकवासला धरणातील पाण्याबाबत इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे. इंदापूरला पाणी देण्याचा विषय समोर आल्यानंतर, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय उपस्थित केला जातो. खडकवासला धरणाबरोबर मुळशी धरणातील पाणीही इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांनी केली आहे.
खडकवासला धरणाच्या स्थापनेपासून इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये आहे. खडकवासला कालव्यासाठी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मागील तीस वर्षांमध्ये काही कालव्यांमध्ये एक थेंबही पाणी आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. ३६ ते ४८ चारींचे लाभक्षेत्र सात हजार एकर असताना या चाºयांना अद्यापपर्यंत पाणी आले नाही, तर लाभ क्षेत्रातील भादलवाडी, मदनवाडी, पोंधवडी या तलावाची साठवण क्षमता केवळ ०.४ टी.एम.सी असताना या तलावामध्ये पाणी सोडण्याचा हक्कच नाकारण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला धरणाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली असल्याचा दावा चुकीचा आहे. शेटफळगढे येथे वॉटर मीटर बसवून नेमके किती पाणी इंदापूर तालुक्याला दिले जाते, याचे लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.
बारामती तालुक्याला चार टीएमसी पाणी जादा दिले जाते. बारामती व दौंड तालुक्यातील पाझर तलाव नियमितपणे भरले जातात. इंदापूर तालुक्यातील तलावाबाबत मात्र दुजाभाव केला जातो. खडकवासलातील पाण्याबरोबर मुळशी धरणातील पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सोय करा, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.तालुक्यातील तलाव भरण्याची मागणी...चालू वर्षी इंदापूर तालुक्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे, त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. उजनी व खडकवासला धरणे पूर्ण क्षमतेने भरली गेली असतानाही अतिरिक्त झालेल्या पाण्यामधून तरी इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याची आवश्यकता आहे; परंतु तालुक्यातील तलाव कोरडे पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील तलाव तातडीने भरण्याची मागणी होत आहे.