पुणे : दुसऱ्या ग्रहांवर पृथ्वीसारखे सजीवांना जगण्यासाठी आवश्यक वातावरण आणि संसाधने मिळणे अवघड आहे. तसेच आपण मंगळावर गेल्यावर श्वासातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे ऑक्सिजनमध्ये रूपांतर कोण करणार? पृथ्वीगृह सोडणे सहज आणि सोपे नाही. त्यामुळे मी तरी मंगळावर जाणार नाही, असे गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.
आयुकातर्फे आयोजित ‘शास्त्रज्ञांशी थेट संवाद’ या ऑनलाइन कार्यक्रमात दुसऱ्या ग्रहावर मानवी वस्ती होईल का? असा प्रश्न डोंबिवली येथील अपूर्व वैद्य याने विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मंगला नारळीकर बोलत होत्या. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, आयुकाचे संचालक डॉ. शोमक रॉयचौधरी, डॉ. सुहृद मोरे आणि डॉ. अनुप्रीता मोरे उपस्थित होते.
डॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, मानवाला पृथ्वीसोडून दुसरीकडे वस्ती करण्यासाठी शंभर वर्षे तरी जाता येणे शक्य नाही. त्यामुळे मानवाने पृथ्वीचे संवर्धन केले पाहिजे.
डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, मानवी वस्तीसाठी पृथ्वीइतका दुसरा योग्य ग्रह नाही. परंतु, काही आर्थिक हितसंबंध असतील किंवा काही संसाधने मिळवायची असतील तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यासठी जाता येईल.
---
प्राथमिक स्तरावर खगोलशास्त्र कसे शिकवावे, यासंदर्भातील अभ्यासक्रमाची बांधणी टाटा इन्स्टिट्यूटच्या मदतीने आयुकामध्ये केली जात आहे. तसेच या संदर्भातील अहवाल केंद्र शासनासह जगभरातील सर्व सरकारांना सादर केला जाणार आहे.
- डॉ. शोमक राॅयचौधरी, संचालक, आयुका
---
प्राथमिक शिक्षणातच खगोलशास्त्राचा समावेश असावा का?, या प्रश्नाला उत्तर देताना नारळीकर म्हणाले, उच्च प्राथमिक वर्षापासूनच निश्चितच खगोलशास्त्र शिकवावे. तसेच विद्यार्थ्यांना हे शिकवत असताना सुरुवातीपासूनच पुस्तक आणि गणिताचा आग्रह धरू नये, असे मत डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केले.