पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार (दि.29 ) जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या संदर्भातील आदेश काढले असून प्रत्येक तालुक्यांच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ही सोडत निघणार आहे.
जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान होऊन निकाल देखील जाहीर झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. परंतु राज्यशासनाने यापूर्वी काढलेली सरपंच आरक्षण सोडत रद्द केली होती. निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सरपंच आरक्षण सोडत काढली जाणार होती.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 29 जानेवारी रोजी तालुकास्तरावर उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सोडत काढावी असे आदेश काढले आहेत.
पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर शिवसेने आपले गड राखतच अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. तर मावळ तालुक्यात कांटे की टक्कर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने गड राखला आहे. दरम्यान, जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या आतुर ग्रामपंचायतीत हातातून गेली आहे. नक्की कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्या. यात जिल्ह्यात 748 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील 95 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर १८ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तर 649 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. त्याचा निकाल सोमवारी लागला.यात अनेक धक्कादायक निकाल देखील लागले आहेत.