पुणे : पी. एम. फांउडेशनतर्फे शनिवारी (दि. २५) सायंकाळी साडेचार वाजता ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘कोविड व मानसिक आरोग्य’ या विषयावर मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक रेश्मा कचरे आणि माधुरी आवटे मार्गदर्शन करणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावरील वर्धमान प्रतिष्ठान येथे हे व्याख्यान होणार आहे.
-----------------
किशोरवयीन मुलींसाठी ऑनलाईन कार्यक्रम
पुणे : भारतीय जैन संघटनेतर्फे रविवारी (दि. २६) राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त किशोरवयीन मुलींसाठी मॅजिक ऑफ स्मार्ट माइंड या ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी टोकियो पॅरालिम्पिक २०२१ स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडू अवनी लाखेरा, भावना पटेल व पलक कोहली यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. संघटनेच्या फेसबुक पेजवर या कार्यक्रमाची लिंक उपलब्ध केली आहे. त्यात अधिकाधिक मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
-------------------
सावरकर यांच्यावर व्याख्यान
पुणे : स्वा. सावरकरप्रेमी मंडळाकडून येत्या २६ सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता ‘सद्य:स्थिती आणि सावरकर’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते दुर्गेश परूळेकर हे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. मंडलाच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम सर्वांना पाहता येणार आहे, त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
----------------------
पाळीव प्राण्यांचे आज लसीकरण
पुणे : जागतिक रेबिज दिनानिमित्त शहरातील पाळीव प्राणी कुत्रा, मांजर यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या शनिवारी (दि. २५) प्रभात रस्त्यावरील पेटपाल क्लिनिक येथे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ८०० प्राण्यांचे लसीकरणाची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
गरजूंसाठी मोफत दवाखाना सुरू
पुणे : मायेचा आधार फांउडेशनतर्फे वर्धापनदिनानिमित्त शहरातील महात्मा फुले पेठ भागात निराधार, अंध, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोफत दवाखाना योजना सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी फांउडेशनचे अध्यक्ष निरंजन अडागळे, कलावती तुपसौंदर, सिंधुताई शेलार, चांगदेव नेटके, सलीम शेख, आदी उपस्थित होते.
------------