पुणे : हैद्राबाद येथील केबीआर पार्क जंक्शन येथील चाैकामध्ये एलईडी सिग्नल यंत्रणेचा प्रयाेग करण्यात आला हाेता. त्याचे फाेटाे माेठ्याप्रमाणावर साेशल मीडियावर व्हायरल झाले हाेते. त्यानंतर पुणे वाहतूक पाेलिसांनी ही सिग्नल यंत्रणा तयार करणाऱ्या कंपनीला पुण्यात बाेलावले हाेते. आता हैद्राबादप्रमाणे पुण्यात देखील एलईडी सिग्नल यंत्रणेचा प्रयाेग करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.
हैद्राबाद येथील एलईडी सिग्नल यंत्रणा सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली हाेती. या सिग्नल यंत्रणेचे फाेटाे साेशल मीडियावर माेठ्याप्रमाणावर व्हायरल झाले हाेते. एलईडी सिग्नल यंत्रणेमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे साेपे हाेणार आहे. तसेच वाहचालक देखील झेब्रा क्राॅसिंगच्या मागे थांबू शकणार आहेत. एका आयटी कंपनीने ही यंत्रणा विकसित केली आहे. त्याचे प्रात्याक्षिक हैद्राबाद पाेलिसांकडून घेण्यात आले हाेते. त्यानंतर पुणे पाेलिसांनी देखील कंपनीच्या अधिका्ऱ्यांशी संपर्क साधत अशी यंत्रणा पुण्यात देखील राबविण्यात येऊ शकते का याबाबत चर्चा केली.
त्यानंतर आता ही यंत्रणा पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर बुधवार चौक (हुतात्मा चौक) आणि डेक्कन परिसरातील नटराज चौक येथे बसविण्यात येणार आहे. पुढील आठवड्यामध्ये याबाबतचे काम सुरू करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे रात्रीच्या वेळी खासकरुन पादचाऱ्यांना याचा माेठा फायदा हाेणार आहे.